टीम इंडियाचा युवा विकेट किपर बॅटर ईशान किशन देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. तो बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेत झारखंड संघाचे नेतृत्व करताना दिसेल, अशी माहिती समोर येत आहे. ही स्पर्धा 15 ऑगस्टपासून तमिळनाडूमध्ये रंगणार आहे. झारखंड राज्याच्या संघातील संभाव्य खेळाडूंच्या यादीत ईशान किशनचं नाव समाविष्ट नव्हते. पण अचानकच त्याचे नाव संघात आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या खांद्यावर संघाची धूरा देखील सोपवण्यात आली आहे.
टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, ईशान किशन याने झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन (JSCA) ला आपला निर्णय कळवल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अचानक माघार घेतल्यानंतर बीसीसीआयने या खेळाडूला चांगलाच दणका दिला होता. टीम इंडियात पुन्हा कमबॅक करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता. त्यामुळं आता कसं तुम्ही म्हणाल तसं, असं काहीसं गाणं म्हणत त्याने बीसीसीआयची अट मान्य केल्याचे दिसते.
ईशांतशिवाय हे स्टार खेळाडू ठरतील लक्षवेधी
जवळपास सहा वर्षानंतर बुची बाबू स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत १२ संघ सहभागी असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. ईशान किशनशिवाय सरफराज खान आणि सूर्य कुमार यादव हे क्रिकेटरही या स्पर्धेचे आकर्षण ठरू शकतील. या स्पर्धेत वडोदरा, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, हैदराबाद , भारतीय रेल्वे, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, मुंबई, टीएनसीए अध्यक्ष एकादश आणि टीएनसीए एकादश या संघांचा समावेश असेल.
वार्षिक करारातून आउट झाला होता ईशान किशन
ईशान किशनची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निवड झाली होती. पण वैयक्तिक कारण सांगत त्याने अचानक या दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर तो दुबईत पार्टी करतानाचे काही फोटोही समोर आले. त्याच्या या कृतीवर बीसीसीआय देखील नाराज झाले होते. तत्कालीन कोच राहुल द्रविड यानेही त्यावेळी स्पष्ट केले होते की, ब्रेक किंवा दुखापतीनंतर संघात कमबॅक करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल. या गोष्टीकडे दुर्लक्ष करत ईशान किशन रणजी खेळलाच नाही. परिणामी वार्षिक करारातून त्याचे नाव गायब झाले.
ईशान किशन करिअर
ईशान किशन याने भारताकडून २ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ३२ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने २०२१ मध्ये वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण केले होते. 2023 मध्ये त्याला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. पण आता पुन्हा संघात कमबॅक करण्यासाठी त्याच्यासमोर मोठे चॅलेंज आहे. तो पुन्हा टीम इंडियात स्थान भक्कम करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Ishan Kishan to lead Jharkhand in upcoming Buchi Babu Trophy Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.