IND vs AUS 3rd ODI | राजकोट : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अखेरचा वन डे सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे या सामन्यातून पुनरागमन झाले आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने या वरिष्ठ खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यातून विश्रांती दिली होती. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले असून रोहित, विराटसह जसप्रीत बुमराहची एन्ट्री झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे इशान किशनला आजारपणामुळे आजच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे.
इशान किशनला का वगळले याबद्दल बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आजारपणामुळे इशान किशन तिसऱ्या वन डेसाठी अनुपलब्ध आहे. त्यामुळे धर्मेंद्र जडेजा, प्रेरक मांकड, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई हे चार स्थानिक राज्य खेळाडू संपूर्ण सामन्यात ड्रिंक्स आणि क्षेत्ररक्षणासाठी संघाला पाठिंबा देतील.
पॅट कमिन्सची एन्ट्री दरम्यान, लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकले. दुसऱ्या सामन्यातील शतकवीर शुबमन गिलला विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांची अखेरच्या सामन्यातून ऑस्ट्रेलियन संघात एन्ट्री झाली आहे. तसेच पाहुण्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची देखील एन्ट्री झाली आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, मिचेल स्टार्क, तन्वीर सांघा आणि जोश हेझलवुड.