नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन याने मानसिक थकव्याचे कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. संपूर्ण वर्षभरात प्रत्येक दौऱ्यात भारतीय संघात समावेश असलेल्या इशानला फार कमी वेळा अंतिम संघात संधी मिळाली. त्यामुळे इशान खरंच थकलाय की त्याने निराश झाल्याने माघार घेतली, अशी चर्चा रंगली आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही शुभमन गिल दुखापतीमुळे अनुपस्थित राहिल्याने इशानला पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळविण्यात आले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी इशानचा भारतीय संघात समावेश केला होता. मात्र प्रत्यक्ष संधी त्याला मिळाली नाही. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीही लोकेश राहुलचाच यष्टिरक्षक म्हणून विचार होत असल्याने अखेर मानसिक थकव्याचे कारण पुढे करत इशानने माघार घेण्याबाबत विनंती भारतीय संघ व्यवस्थापनाकडे केली. त्याच्या विनंतीचा मान ठेवत संघ व्यवस्थापनाने त्याला मायदेशी परतण्यासाठी परवानगी दिली आहे.
बीसीसीआयने यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. १९८३चे विश्वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी खेळाडूंना मानसिक थकवा दूर करण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला होता. त्यांनी खेळाडूंना आयपीएल न खेळण्याचा सल्ला २०२० मध्ये दिला होता. भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा यानेही इशानला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून टीका केली होती.