वेलिंग्टन : अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि युवा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ याला २१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत अंतिम एकादशमध्ये खेळविण्याचे संकेत कर्णधार विराट कोहली याने बुधवारी दिले. आज झालेल्या नेट सरावादरम्यान जे चित्र दिसले त्यावरून शुक्रवारी सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत ऐवजी रिद्धिमान साहा जबाबदारी सांभाळेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आणि ईशांत शर्मा हे संघात तीन तज्ज्ञ वेगवान गोलंदाज असतील. सहाव्या स्थानावरील फलंदाज हनुमा विहारी हा पाचव्या गोलंदाजाची उणीव भरून काढू शकतो. रविचंद्रन अश्विन हा एकमेव तज्ज्ञ फिरकीपटू असेल शिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्याकडेदेखील डोळेझाक करता येणार नाही.
रणजी करंडकादरम्यान घोट्याला दुखापत झाल्यामुळे ईशांत तीन आठवडे संघाबाहेर होता. त्याने नेटवर भेदक मारा केला. उसळी घेणाºया चेंडूवर फलंदाजांना चकित करीत अनेकांची वाहवा लुटली. यावर कोहली म्हणाला, ‘ईशांत आज प्रभावी जाणवला. त्याने न्यूझीलंडमध्ये आधीही कसोटी सामने खेळले आहेत. त्याचा अनुभव संघाला लाभदायी ठरेल. वेगवान मारा करीत अलगद टप्प्यावर चेंडू टाकताना त्याला पाहणे सुखद असते. ’
पृथ्वी शॉच्या नैसर्गिक फलंदाजीत बदल करण्याची योजना नसल्याचे सांगून कोहलीने शुभमान गिल याला पुन्हा बाकावर बसावे लागेल, असे संकेत दिले. तो म्हणाला, ‘पृथ्वी प्रतिभावान फलंदाज असून तो सहज खेळतो. कोणत्याही स्थितीत उत्कृष्ट खेळ करण्याचे त्याच्यावर दडपण नाही. विदेशात चांगली कामगिरी करण्याचे ओझे नसल्यामुळे पृथ्वीला संधी देणे सयुक्तिक ठरेल. मयांकने आॅस्ट्रेलियात ज्या पद्धतीने कामगिरी केली तशी कामगिरी पृथ्वीकडून न्यूझीलंडमध्ये अपेक्षित असेल. बेधडक खेळाडूंमुळे संघाचे मनोधैर्य उंचावते. अशा खेळाडूंमुळे चांगली सुरुवातदेखील मिळते.’
कोहलीने एकदिवसीय मालिकेत झालेल्या दारुण पराभवाची आठवण काढू नका, असे सांगत कसोटीत युवा खेळाडूंनी विजयात योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
ईशांतलाही गंभीरपणे घ्या : रॉस टेलर
पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराह नव्हे, तर तंदुरुस्त झालेला वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याचा मारादेखील यजमान संघासाठी डोकेदुखी असेल, असे मत न्यूझीलंडचा फलनदाज रॉस टेलर याने व्यक्त केले.दोन आवड्यानंतर स्वत:चा ३६ वा वाढदिवस साजरा करणारा टेलर २१ फेब्रुवारीपासून शंभरावी कसोटी खेळणार आहे. त्याने २३१ वन डे तसेच १०० टी-२० सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले असून तिन्ही प्रकारात प्रत्येकी १०० सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरेल.
Web Title: Ishant, Prithvi Shaw have a chance against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.