टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ३६ वर्षांचा झालाय. आयपीएलमध्ये आजही तो सक्रीय दिसत असला तरी टीम इंडियात कमबॅकसाठीचे त्याचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात तो शेवटचा टीम इंडियात दिसला होता. लांब केसांसह टीम इंडियात एन्ट्री करणारा लंबूजी भारतीय ताफ्यातील यशस्वी जलदगती गोलंदाजांपैकी एक आहे.
या लंबूजीनं रिकी पाँटिंगला दिवसा दाखवले होते तारे
त्याने अनेकदा आपल्या खतरनाक स्पेलनं टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले. त्याने ऑस्ट्रेलियात जाऊन रिकी पाँटिंगला दिवसा तारे दाखवले होते. इशांत शर्मा याने २००८ मध्ये पर्थच्या मैदानात रिकी पाँटिंगला हैराण करून सोडले होते. त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेलमध्ये या स्पेलचा समावेश होतो. ६ फूट ४ इंच उंचीच्या इशांतनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ टेस्टमधील दुसऱ्या डावात ९ षटकांचा जबरदस्त स्पेल टाकला होता.
रिकी पाँटिंगला असं अडकवलं होत जाळ्यात
या सामन्यात इशांत शर्मानं ८ षटके अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करूनही त्याच्या हाती विकेट लागली नव्हती. तत्कालीन टीम इंडियाचा कॅप्टन अनिल कुंबळे त्याला विश्रांती देणार होता. पण सेहवागनं इशांत मोठे स्पेल टाकण्यात सक्षम असल्याचे कॅप्टनला पटवून दिले. नवव्या षटकात इशांतनं सेहवाग आणि कॅप्टन कुंबळे या दोघांचा विश्वास सार्थ ठरवत पाँटिंगला तंबूचा रस्ता दाखवला होता. इनस्विंग आणि हवेत आउट स्विंगचा फंडा आजमावणाऱ्या इशांत शर्मानं रिकी पाँटिंगला चेंडू अगदी सरळ ठेवून चकवा दिला होता. भारतीय गोलंदाजाचा हा स्पेल अन् विकेट अविस्मरणीय अशीच होती. याशिवाय स्मिथसोबतचा पंगा अन् मैदानात आक्रमक अंदाजात तो घालणारा दंगा आजही चाहत्यांच्या लक्षात असेल.
कपिल पाजी अन् जहीर खान यांच्यानंतर लागतो त्याचा नंबर
इशांत शर्मानं भारताकडून १०५ कसोटी सामन्यासह ८० एकदिवसीय आणि १४ टी २० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. यात त्याने कसोटीत ३११ विकेट्स घेतल्या. वनडे आणि टी-२० मध्ये अनुक्रमे ११५ आणि ८ विकेट्स त्याच्या नावे आहेत. भारताकडून सर्वात यशस्वी जलदगती गोलंदाजांच्या यादीत तो कपिल पाजी (४३४ विकेट्स), झहीर खान (३११) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.