बंगळुरूऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आता दुखापतीतून सावरला असून त्यांनं नेट्समध्ये सरावही केला आहे.
इशांतने बुधवारी बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर निवडसमितीचे प्रमुख सुनील जोशी आणि एनसीए प्रमुख माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यासमोर जवळपास दोन तास सराव केला. इशांतला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दुखापत झाली होती. यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं होतं. इशांतच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने गोलंदाजी करणं त्याला शक्य होत नव्हतं. या वर्षात इशांतची ही दुसरी दुखापत होती. याआधी फेब्रुवारी महिन्यातही इशांतला दुखापत झाली होती.
इशांतने दुखापतीवर मात करुन आता चिन्नास्वामी स्टेडियमवर दमदार गोलंदाजी केली. यावेळी निवडसमितीचंही इशांतच्या गोलंदाजी आणि फिटनेसकडे लक्ष होतं. बीसीसीआयमधील सुत्रांच्या महितीनुसार इशांत पूर्णपणे फीट असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. त्यामुळे इशांत लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इशांतच्या येण्याने भारतीय संघाच्या भात्यात बुमराह, शमी यांच्यासह आणखी एक वेगवान अस्त्र दाखल होईल. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर याआधी इशांतने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे इशांत शर्माचं फीट होणं भारतीय संघासाठी नक्कीच जमेची बाजू आहे.
इशांतला नव्या विक्रमाची संधीइशांत आणखी तीन कसोटी सामने खेळल्यास भारताकडून १०० कसोटी सामने खेळणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याच्या नावाची नोंद होऊ शकते. सध्या कपिल देव यांच्या नावावर या विक्रमाची नोंद आहे.