Ishant Sharma visit Kedarnath: IPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ चांगला खेळ दाखवू शकला नाही. हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. पण एका खेळाडूने या संघात पुनरागमन करत चांगला खेळ दाखवला होता. हा खेळाडू आहे इशांत शर्मा. इशांत तीन वर्षांनी आयपीएल खेळला आणि त्याने चांगली कामगिरी केली. आता आयपीएल संपले आणि इशांत भगवान शंकराच्या चरणी लीन झाला. इशांत सध्या केदारनाथला असल्याचे दिसले. इशांतच्या केदारनाथ भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यावेळी अनेक लोक केदारनाथ यात्रेला जात आहेत. सारा अली खान आणि विकी कौशलही केदारनाथला गेले होते. यावेळी केदारनाथमध्ये लोकांची मोठी गर्दी असते. तशातच इशांतही केदारनाथला गेला आहे.
इशांतला चाहत्यांनी घेरले
गर्दीमुळे इशांतला इथून प्रवास करणं सोपं नव्हतं. इशांतला पाहताच लोकांनी त्याला घेरले आणि फोटो काढणे आणि व्हिडिओ बनवणे सुरू केले. मात्र, इशांतने त्याच्या चाहत्यांना निराश न करता त्यांच्याशी संवाद साधला आणि सेल्फीही काढले. इशांत येथे एकटा पोहोचला नाही. इशांतची पत्नी, भारताच्या बास्केटबॉल संघाचा माजी कर्णधार त्रिदीप राय, महिला बास्केटबॉल संघाची माजी कर्णधार प्रशांती सिंग हे देखील त्यांच्यासोबत होते.
यावेळी अनेक क्रिकेटपटू मंदिरांना भेट देत असल्याच्या बातम्या येत आहेत. विराट कोहली आणि त्याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी मुक्तेश्वर धाम आणि महाकालेश्वरला भेट दिली होती. केएल राहुलही महाकालेश्वरला पोहोचला होता. केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर येथेही लोकांची गर्दी होत आहे. अनेक सेलिब्रिटी येथे पोहोचत आहेत. त्यातच आता इशांतनेही केदारनाथला हजेरी लावली.
दरम्यान, इशांत शर्मा हा एकेकाळी टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असायचा. तो कसोटी संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा केंद्रबिंदू असायचा. या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला. तेव्हापासून तो संघाचा भाग नाही. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशांत प्रयत्नशील आहे. इशांतने तीन वर्षांनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन केले. तो 2019 मध्ये आयपीएल खेळला आणि त्यानंतर 2020, 2021, 2022 मध्ये आयपीएलमध्ये एकही सामना खेळला नाही.