Join us  

पुजारा, रहाणे! या तिळांमधून आता तेल निघणे कठीणच!

कसोटी क्रिकेटमधील भारताचे हुकमी एक्के म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 5:54 AM

Open in App

मतीन खान

कसोटी क्रिकेटमधील भारताचे हुकमी एक्के म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडताना दिसत आहेत. सध्या सुरू असलेला दक्षिण आफ्रिका दौराही याला अपवाद ठरलेला नाही. एकेकाळी परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय डावाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुजारा आणि रहाणे जोडीचे सध्या सुमार कामगिरीमुळे संघातील स्थानही धोक्यात आले आहे. धावांची टांकसाळ उघडणाऱ्या या दोघांना गेल्या वर्षभरात साधे एक शतकही झळकावता आलेले नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या २०२१ मधील आकडेवारीवर टाकलेली एक नजर...

मागील वर्षभरापासून पुजारा, विराट आणि रहाणे फॉर्ममध्ये परतण्याची चाहते प्रतीक्षा करीत आहेत. बरे झाले सलामीवीर आणि तळाच्या फलंदाजांनी आणीबाणीच्या वेळेला धाडस दाखवून संघाचा बचाव केला. रोहित, राहुल, ऋषभ, हनुमा, जडेजा आणि अश्विन यांनी फलंदाजीत उल्लेखनीय योगदान दिले.  लॉर्डस् कसोटीच्या दुसऱ्या डावात बुमराह आणि शमी यांनी आक्रमक फलंदाजीच्या बळावर भारताला मुसंडी मारुन दिली, शिवाय विजयदेखील मिळवून दिला.

 मग आमचे तीन महान फलंदाज करतात तरी काय? विराटने अखेरचे कसोटी शतक नोव्हेंबर २०१९ ला बांगला देशविरुद्ध झळकाविले होते.  त्यानंतर काही डावांत त्याने किमान धावा काढल्या. त्यात शतकी खेळी नव्हती. द. आफ्रिकेविरुद्ध सध्या तो बाहेर आहे;  पण पुजारा आणि रहाणे यांचे काय?  पुजाराने अखेरचे शतक दोन वर्षांआधी जानेवारी २०१९ ला मेलबोर्न येथे  ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले.  मागच्या १२ कसोटीत त्याच्या नावावर १, १६, ००, ४७, २२, २६, ०४, ६१, १, ९१, ०९, ४५, ०४, १२, ०८, १५, १७, ००, ००, १६ आणि ०३ अशा धावांची नोंद आहे.

रहाणेने मागच्यावर्षी मेलबोर्न कसोटीत नेतृत्व करीत अविस्मरणीय शतकी खेळी केली. त्यानंतर मात्र नाबाद २७, २२, ०४, ३७, २४, १,००, ४८, २०,०० अशी नोंद आहे.फलंदाजांच्या कारकीर्दीत चढ-उतार येतातच. ज्यांना संस्मरणीय निरोप मिळाला, असे बोटावर मोजण्यासारखे फलंदाज आहेत. त्यांना निरोप देताना चाहते म्हणाले,‘ अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नही....’

अनेक फलंदाज मात्र खराब फॉर्म आणि खराब कामगिरीमुळे संघातून ‘आऊट’ झाले. खेळाची दुसरी बाजू अशीच असते. मैदानावरील कामगिरीच तुमच्या बाजूने असते. तुम्ही कितीही दिग्गज असला, तरी खराब कामगिरीमुळे अखेर दुदैर्वी होते. आता श्रेयस, सूर्यकुमार, शुभमन, पृथ्वी यांच्यावर विश्वास दाखविण्याची वेळ आलेली दिसते. आज पुजारा आणि रहाणे यांनी फलंदाजीत जी हाराकिरी केली त्यावर

हा शेर लागू पडतो... ‘आज फिर बुझ गए जल जल के उम्मीदों के चिराग, आज फिर तारों भरी रात ने दम तोड़ दिया।’

टॅग्स :अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा
Open in App