मुंबई : माझी स्विंगवरची हुकूमत अजूनही कायम आहे. मात्र, कामगिरीत सातत्य राखण्यात आलेल्या अपयशासाठी तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना दोष देणे मुख्य मुद्यापासून भरकटण्यासारखे आहे, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने व्यक्त केले.
३५ वर्षीय इरफान पठाणने शनिवारी क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा करताना सांगितले, की अनेक खेळाडू भारतीय संघासोबत आपले करिअर २७-२८ व्या वर्षी सुरू करतात, पण या वयात मी माझी अखेरची लढत खेळलो.
पठाण २७ वर्षांचा असताना २०१२ मध्ये आपला अखेरचा सामना खेळला होता. एकवेळ या वेगवान गोलंदाजाबाबत क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पठाण म्हणाला, ‘अशा प्रकारची चर्चा... लोकांची ग्रेग चॅपेलबाबत चर्चा या सर्व बाबी मुद्यापासून भरकटणाऱ्या होत्या. इरफान उत्सुकता दाखवित नाही, अशीही चर्चा कानावर पडली होती. इरफानची पूर्वीप्रमाणे स्विंगवर कमांड नाही, असाही भास निर्माण करण्यात आला होता. पण, लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे, की सामन्याच्या पहिल्या १० षटकांत जसा स्विंग मिळतो तसा पूर्ण सामन्याभर मिळू शकत नाही. मी आताही चेंडू स्विंग करण्यास सक्षम आहे.’
इरफान म्हणाला, ‘लोक माझ्या कामगिरीबाबत चर्चा करतात, पण माझे काम वेगळ्या प्रकारचे होते. मला धावांवर लगाम घालण्याचे काम सोपविण्यात आले होते, कारण मी फर्स्ट चेंज म्हणून गोलंदाजीला येत होतो. मला आठवते, की श्रीलंकेमध्ये २००८ मध्ये सामना जिंकल्यानंतर मला वगळण्यात आले होते. देशासाठी सामना जिंकल्यानंतर कुणाला कुठल्याही कारणाशिवाय वगळण्यात येते?
पठाणने माजी कर्णधार सौरभ गांगुली, राहुल द्रविड व अनिल कुंबळे यांचीही प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)
>दुखापतीचा कारकिर्दीवर परिणाम
अनेक माजी खेळाडूंच्या मते पठाण दीर्घ काळ खेळू शकला असता, पण दुखापतीमुळे त्याला आपल्या क्षमतेनुसार खेळ करता आला नाही.
आयपीएल २००८ नंतर पठाणच्या तिन्ही स्वरुपाच्या क्रिकेटमध्ये खेळण्याच्या इच्छेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, पण या अष्टपैलूने सांगितले, की अशी कुठली बाब नाही. पठाण म्हणाला, ‘मी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी इच्छुक होतो. मी २००९-१० मध्ये पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होतो. दुखापतीचे कारण कळण्यासाठी मी सर्व प्रकारचे स्कॅन केले. दुर्दैवाने त्यावेळी आपल्याकडे अशा मशीन्स उपलब्ध नव्हत्या, की ज्यामुळे पाठदुखीचे कारण स्पष्ट होईल. मी दोन वर्षे पाठदुखीमुळे त्रस्त होतो. पण मी रणजी स्पर्धेत खेळणे सोडले नाही.’
अडचणींनंतरही मी पूर्ण प्रयत्न केले असे सांगताना पठाण म्हणाला, ‘त्या कालावधीत माझा वेग कमी झाला. कारण मी पूर्णपणे फिट नव्हतो. मी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले. कारण मी देशातर्फे खेळण्यास इच्छुक होतो आणि कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास प्रयत्नशील होतो.’
Web Title: It doesn't make sense to blame Chappell - Irfan Pathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.