मुंबई : सलग चांगली कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमार यादव याला अखेरीस आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ही निवड होणे हे स्वप्नवत होते, असे सूर्यकुमारने म्हटले आहे.
आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर देखील सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. त्यावेळी निवड समितीवर टीकादेखील करण्यात आली होती. सूर्यकुमार याने डी. वाय. पाटील स्टेडिअमवर फोटो काढला आणि तो टि्वटरवर फोटो पोस्ट केला आहे. त्याखाली म्हटले की, हा स्वप्नवत अनुभव आहे.’
मुंबईच्या ३० वर्षांच्या फलंदाजाने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने ७७ प्रथमश्रेणी सामन्यात ५३२६ धावा केल्या आहेत. काही माजी भारतीय खेळाडूंनी सूर्यकुमार यादवच्या निवडीवर आनंद व्यक्त केला. ऑफस्पिनर हरभजन सिंग याने ट्विट करून सांगितले की, ‘खूप मजा येत आहे. अखेरीस सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान मिळाले.’ माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाण याने ट्विट केले की, अखेरीस सूर्यकुमार यादव याची प्रतीक्षा संपली आहे. ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांनादेखील शुभेच्छा.’ चार कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारताला पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.