रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत भारताने आशिया चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आता भारतीय संघाचं लक्ष्य हे वनडे वर्ल्डकपवर आहे. या आयसीसी स्पर्धेचं यजमानपद भारत भूषवणार आहे. मात्र वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघातील एका स्फोटक फलंदाजाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळणं कठीण दिसत आहे. त्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये बेंचवरच बसून राहावे लागण्याची शक्यता अधिक आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रेकॉर्ड आठव्यांदा आशिया चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ५० धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर भारतीय संघाने १० विकेट्स राखून विजय मिळवला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या यांनी भेदक गोलंदाजी केली. सिराजने सहा तर पांड्याने ३ विकेट्स टिपल्या.
दरम्यान, आशिया चषक स्पर्धेतील एक खेळाडू संधी मिळाल्यानंतरही अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नाही तर सूर्यकुमार यादव आहे. सूर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान मिळणं कठीण वाटत आहे. त्याचं कारण म्हणजे आशिया चषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवला एकाच सामन्यात संधी मिळाली. मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
सूर्यकुमार यादव याला आशिया चषक स्पर्धेमध्ये केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. बांगलादेशविरुद्धच्या सुपर ४ सामन्यात तो खेळला होता. मात्र त्या सामन्यात त्याला केवळ २६ धावाच जमवता आल्या. भारताला त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
दरम्यान, श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन झाल्यास कुणाला संघाबाहेर जावं लागणार याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. श्रेयस अय्यर संघात परतल्यास इशान किशनला संघाबाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. किशनने आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली असली तरी श्रेयस अय्यर संघात परतल्यावर चौथ्या क्रमांकावर उतरेल. तर के.एल. राहुलला पाचव्या क्रमांकावर उतरावे लागेल. सध्या या क्रमांकावर इशान किशन उतरतो. तसेच लोकेश राहुल यष्टीरक्षकाचीही भूमिका बजावेल.