भारतीय संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंतवर सध्या जोरदार टीका होत आहे. महेंद्रसिंग धोनीला रिप्लेसमेंट म्हणून पंतकडे पाहिले जात असताना त्याला अपेक्षांवर खरं उतरता आलेले नाही. त्यामुळे त्याची हकालपट्टी करा आणि पुन्हा धोनीला आणा, अशी मागणी होत आहे. पण, युवराज सिंगने पंतच्या बचावासाठी उडी मारली आहे. त्यानं कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सल्लाच देऊन टाकला आहे. "धोनीही एका दिवसात घडला नव्हता. पंतला थोडासा वेळ द्या. त्याला कोहलीच्या पाठिंबा आणि मार्गदर्शनाची गरज आहे. सध्याच्या घडीला संघ व्यवस्थापनाने पंतवर दबाव आणला आहे. दबावाखाली पंत चांगली कामगिरी करू शकणार नाही. त्यामुळे त्याला अजून वेळ देण्याची गरज आहे," असे युवराजने म्हटले आहे.
युवराज पुढे म्हणाला की, " पंतला आतापर्यंत काही संधी मिळाल्या आहेत. पण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. आता ट्वेन्टी-20 विश्वचषकाला फक्त एक वर्ष उरले आहे. जर संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच तो विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकतो. विदेशी विकेट्सवर पंतने आतापर्यंत दोन शतके लगावली आहेत. पंतला सांभाळून घ्यायला हवे. त्याच्या वयाचा विचार करून त्याच्याकडून कामगिरी काढून घेणे हे संघ व्यवस्थापनाचे काम असते. त्यामुळे आगामी विश्वचषक पाहता पंतला संघात कायम ठेवून त्याच्यावर विश्वास दाखवायला हवा."