-सौरव गांगुली लिहितात...
विराट कोहली अॅन्ड कंपनी दीर्घ वेळेनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सज्ज झाली आहे. विश्रांती आणि सराव सामन्यातील अनुभवाच्या आधारे विराट तसेच संघ व्यवस्थापनाला इंग्लंडविरुद्ध डावपेच आखण्यास वेळ मिळाला असेलच.
फिरकी जोडीबद्दल बरेच काही बोलले गेले. आता संघ व्यवस्थापन कुठले पाऊल उचलते हे पाहणे रंजक ठरणार आहे. मागील दोन दिवसांपासून बर्मिंघम येथे सतत पाऊस सुरू आहे. सामन्याच्या निकालासाठी ही बाब निर्णायक ठरू शकेल. अशावेळी अश्विनला बाहेर बसविण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनासाठी सोपा ठरणार नाही. कुलदीपला गेल्या काही सामन्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांनी सहज टोलविल्यामुळे आश्विनचा समावेश आवश्यक झाला आहे. आश्विनच्या चेंडूत विविधता असते. ३०० बळींचा अनुभव असलेल्या या खेळाडूकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.
भारताने मागची कसोटी द. आफ्रिकेत जिंकली. येथे मात्र जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांची उणीव जाणवणार आहे. संघाचा वेगवान मारा उमेशच्या खांद्यावर विसंबून असेल. उमेश उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सोबतीला अनुभवी ईशांत शर्मा आहेच. तो कौंटी क्रिकेटदेखील खेळला असल्याने इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे.
फलंदाजीबाबत बोलायचे तर लोकेश राहुल आणि मुरली कार्तिक यांना सलामीला खेळायला हवे. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे असा क्रम असावा. विदेशात संघाची भिस्त त्यांच्या सलामी जोडीवर बऱ्याचअंशी अवलंबून असते. याशिवाय विराटचा फॉर्मदेखील निर्णायक सिद्ध होईल.
पावसामुळे इंग्लंडला दिलासा लाभला असावा. यंदाचा मोसम भीषण गरमीचा ठरला. पावसामुळे वातावरणात गारवा आला. यामुळे चेंडू वळविणे सोपे होते. या पार्श्वभूमीवर विराट आणि अॅन्डरसन यांच्यात शाब्दिक युद्धाला तोंड फुटले. २०१४ च्या तुलनेत आता विराटमध्ये बराच बदल झाला हे विशेष.
यजमान संघात अॅन्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्याशिवाय बेन स्टोक्स, मोईन अली आणि आदिल शाह हे मालिकेत निर्णायक ठरू शकतात. यजमान संघाची भिस्त असेल ती स्विंग गोलंदाजीवरच. असे घडले नाही तर भारताची भक्कम फलंदाजी इंग्लंडसाठी सतत डोकेदुखी ठरू शकेल. (गेम प्लान)
Web Title: It is impossible to ignore Ashwin against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.