मुंबई - पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आता वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय संघाला अंतिम रूप देण्यासाठी पूर्वतयारी सुरू आहे. तसेच या संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक युवा क्रिकेटपटूंकडून दावेदारी सुरू आहेत. त्यातच नुकत्याच आटोपलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचा फॉर्म पाहून त्याला भारतीय संघात स्थान कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, या प्रश्नाचं धक्कादायक उत्तर भारतीय संघातील एका स्टार क्रिकेटपटूने दिलं आहे.
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे करंडक २०२२ स्पर्धेमध्ये तुफानी फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. या स्पर्धेत ऋतुराजने केवळ ५ सामन्यांमध्ये सलामीला येताना २२० धावांच्या जबर सरासरीने ६६० धावा फटकावल्या. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश होता. या स्पर्धेतील एका सामन्यात ऋतुराजने एका षटकात सात षटकार ठोकले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला होता.
मात्र भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. भारतीय संघातील सिनियर सदस्य आर. अश्विनने ऋतुराज गायकवाडच्या खेळाचं कौतुक केलं आहे. मात्र त्याच्या मते भारतीय संघातील अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे ऋतुराज गायकवाडला खूप कठीण ठरेल. त्याचं कारण म्हणजे तो भारतातून खेळतो. भारतीय संघाच तो कुणाची जागा घेईल? संघात स्थान मिळवण्यासाठी त्याची स्पर्धा शिखर धवन, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशी आहे. तसेच ऋषभ पंतही सलामीला येतो.
त्याने पुढे सांगितले की, भारत प्रत्यक्षात क्रिकेट खेळण्यासाठी एक कठीण देश बनत चालला आहे. संघात एका स्थानासाठी स्पर्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऋतुराज तिला अधिक वेग देत नाही आहे. तो आनंदासाठी धावा बनवत आहे. त्याने आनंद लुटण्यासाठी धावा बनवल्या आहेत. अदभूत, खूप उत्तम, असे अश्विनने म्हटले आहे.