मुंबई : आयपीएलच्या १५ व्या पर्वात द. आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिस हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. विराट कोहलीसारख्या खेळाडूंची मदत मिळणार असल्याने डुप्लेसिस रोमांचित आहे. याआधी तो महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २०१२ पासून सीएसकेचा खेळाडू होता. ‘धोनीच्या नेतृत्वात खेळलो हे मी माझे भाग्य समजतो,’असे डुप्लेसिसने म्हटले आहे.
‘आरसीबी’ने डुप्लेसिसला सात कोटीत खरेदी केले. ३७ वर्षांचा हा खेळाडू एका मुलाखतीत म्हणाला,‘दीर्घकाळ मी धोनीच्या नेतृत्वात खेळू शकलो हे माझे भाग्य मानतो.’
केकेआरविरुद्ध आज शनिवारी होणाऱ्या सलामीच्या सामन्याआधीच धोनीने सीएसकेचे नेतृत्व सोडले आणि ते जडेजाकडे सोपविले. विश्वविजेता कर्णधार धोनीचे कौतुक करत डुप्लेसिस पुढे म्हणाला,‘धोनीला मी संघाचे नेतृत्व करताना फार जवळून पाहू शकलो. तो कशा पद्धतीने खेळाडूंना एकसंघ ठेवायचा, कसे कौशल्य पणाला लावायचा हे पाहण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.’
अपेक्षांचे ओझे कसेल का? असे विचारताच डुप्लेसिस म्हणाला,‘ असे काहीही नाही. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांच्यासारख्यांच्या ‘कोअर ग्रुप’चा मला मोठा लाभ होणार आहे. विराट हा दीर्घकाळ भारताचा कर्णधार राहिला. भारतीय क्रिकेट आणि आरसीबीला त्याने बरेच काही दिले आहे. त्याचा अनुभव, क्रिकेटचे ज्ञान आणि माहिती या सर्व गोष्टी संघासाठी लाभदायी ठरणार आहेत. अनेक सामन्यांत नेतृत्व करणारा मॅक्सवेलदेखील संघात आहे. विशेषत: टी-२० त रणनीती बनविण्याची आणि नव्या संकल्पना राबविण्याची मॅक्सवेलची पद्धत कामी येणार आहे. सोबत दिनेश कार्तिक हा देखील आहेच.’
Web Title: It is my good fortune to play under Dhoni's leadership says faf du plessis
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.