Join us  

आज पुन्हा गेल वादळ धडकण्याची शक्यता

पंजाब संघाची गेल व केएल राहुल ही जोडी शानदार फॉर्मात असेल तर दिल्ली संघात ऋषभ पंत व श्रेयस अय्यर हे युवा फलंदाज आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:08 AM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या पर्वात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला सोमवारी गृहमैदानावर किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दिल्लीपुढे ख्रिस गेलला रोखण्यासह पंजाबची विजयाची मालिका खंडित करण्याचे आव्हान राहील.कामगिरीचा विचार करता दिल्ली संघाची स्थिती दयनीय आहे. पहिल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असून हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे. याउलट पाचपैकी चार सामन्यात विजय मिळवणारा पंजाब संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.गुणतालिकेतील तळाच्या व अव्वल संघांदरम्यान ही लढत होत असली तरी संघ मात्र तुल्यबळ आहेत. पंजाब संघाची गेल व केएल राहुल ही जोडी शानदार फॉर्मात असेल तर दिल्ली संघात ऋषभ पंत व श्रेयस अय्यर हे युवा फलंदाज आहेत. कर्णधार गौतम गंभीरचे अपयश दिल्ली संघासाठी चिंतेचा विषय आहे तर पंजाब संघाच्या मधल्या फळीत करुण नायरचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना विशेष संधी मिळालेली नाही. ज्यावेळी त्यांना संधी मिळाली त्यावेळी त्यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यात युवराज व अ‍ॅरोन फिंच यांचाही समावेश आहे.गेलला रोखणे कठिण भासत असून त्याने केवळ तीन सामन्यांत एक शतक व दोन अर्धशतकांच्या जोरावर २२९ धावा केल्या आहे. राहुलही शानदार फॉर्मात आहे. राहुलने पाच सामन्यात २१३ धावा केल्या आहेत. दिल्लीचे गोलंदाज या जोडीला कसे रोखतात, याबाबत उत्सुकता आहे. दिल्लीची दारोमदार ट्रेंट बोल्टवर आहे. त्यांच्या फिरकीपटंूना अन्य संघांच्या फिरकीपटूंच्या तुलनेत छाप सोडता आलेली नाही.गंभीरला दिल्लीचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कर्णधारपद व फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. त्याने पाच सामन्यांत आतापर्यंत केवळ ८५ धावा केल्या. त्यात एका ५५ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याने ही खेळी पंजाबविरुद्धच केली होती.पंत व अय्यर यांनी गेल्या लढतीत आरसीबीविरुद्ध चांगली खेळी केली. संघाला या दोघांना अशाच प्रकारच्या कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. पंतने पाच सामन्यांत २२३ धावा केल्या.जेसन रायने नाबाद ९१ धावांची खेळी केल्यानंतर त्याला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही तर क्रिस मॉरिस व ग्लेन मॅक्सवेल यांना अद्याप छाप सोडता आलेली नाही. पंजाब संघाकडे कर्णधार रविचंद्रन अश्विनच्या रुपाने हुशार गोलंदाज आहे, पण अन्य गोलंदाजांना अधिक अनुभव नाही. त्याचा दिल्लीचे फलंदाज लाभ घेऊ शकतात. 

टॅग्स :आयपीएल 2018