Join us  

भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थापनावर विचार होणे आवश्यक

सोमवारी निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:31 AM

Open in App

- अयाझ मेमनसोमवारी निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड केली. टी-२० संघात दोन नवे चेहरे आले आहेत. पहिला म्हणजे मुंबईचा श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा मोहम्मद सिराज. त्याचवेळी रिषभ पंतला जागा मिळाली नसून काही दिवसांपूर्वीच निवृत्त होणार असल्याचे जाहीर केलेल्या अनुभवी आशिष नेहराला एका लढतीसाठी स्थान मिळाले आहे.निवडण्यात आलेला संघ पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येईल की, पुन्हा एकदा गुणवान युवा फलंदाज रिषभ पंतला डावलण्यात आले. कदाचित यंदाच्या देशांतर्गत स्पर्धेतील त्याचा ढासळलेला फॉर्म यासाठी कारणीभूत असेल. पण, एका दृष्टीने त्याच्यासाठी ही चांगली बाबही आहे. कारण कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्याला एक धडा शिकण्यास मिळेल आणि या जोरावर तो आपल्या खेळामध्ये आणखी सुधारणाही करेल.कसोटी संघात विशेष बदल दिसून आला नाही. पुन्हा तंदुरुस्त झाल्याने मुरली विजयने आपली जागा मिळवली आहे. त्यामुळे अभिनव मुकुंदला आता बाहेर बसावे लागेल जे अपेक्षित होते. पण, दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे, यामागे एक कारण आहे. ते म्हणजे, कर्णधार विराट कोहलीने सांगितले की कदाचित तो तिसरा कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी उपलब्ध असणारनाही. यासाठी त्याने वैयक्तिक कारण दिले आहे.त्याचप्रमाणे, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी त्याने भारतीय खेळाडू सातत्याने खेळत असल्याने त्यांच्यावर शारीरिक ताण येत असल्याचेही म्हटले होते. त्यामुळे वैयक्तिक कारणामुळे की थकव्यामुळे तो खेळू शकणार नाही हे सांगणे कठीण आहे. पण या गोष्टीवर बीसीसीआयला नक्कीच विचार करावा लागेल. कारण नुकतीच श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या देशात मालिका झाली, त्यानंतर पुन्हा एक मालिका खेळणार आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका दौरा होईल. त्यामुळे, खेळाडूंसाठी रोटेशन पद्धत महत्त्वाची आहे. एकूणच कशाप्रकारे व्यवस्थापन असावे यावर बीसीसीआयने आता गांभीर्याने विचार करायला पाहिजे.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. याआधी वर्षभरापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेली पाच सामन्यांची मालिका भारताने २-२ अशा बरोबरीनंतर ३-२ अशा फरकाने जिंकली होती. त्यामुळे किवी संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नक्कीच मजबूत आहे, हे विसरता कामा नये.सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांची जी काही हवा बनली होती, ती पहिल्या सामन्यात कमी झाली आहे. त्यामुळे भारताला पुढील सामन्यात सांभाळून खेळावे लागेल. कोहलीचे विक्रमी ३१वे शतक व्यर्थ गेले, कारण इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आणि न्यूझीलंडने शानदार विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली.(संपादकीय सल्लागार)