T20 World Cup 2021, India vs New Zealand: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडनं भारतावर ८ विकेट्स आणि ३३ चेंडू राखून दणदणीत विजय साजरा केला. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर आता माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून जोरदार टीकेला सुरुवात झाली आहे. यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं भारतीय संघाच्या एकंदर मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
भारतीय संघानं रोहित शर्माऐवजी इशान किशन याला सलामीला पाठवण्यामागे नेमकी कोणती योजना होती असा सवाल त्यानं उपस्थित केला आहे. यासोबत हार्दिक पंड्यानं थोडं लवकर गोलंदाजी करायला हवी होती असंही मत त्यानं व्यक्त केलं आहे.
"भारतीय संघ नेमकं कोणत्या मानसिकतेनं खेळायला उतरला आहे तेच काही कळेनासं झालं आहे. रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांवर फलंदाजीला पाठवण्यामागे नेमका काय उद्देश होता? इशान किशनला तुम्हील सलामीला का पाठवलं? हार्दिक पंड्यालाही गोलंदाजी खूप उशिरा दिली. त्याला थोडं आधीच गोलंदाजी द्यायला हवी होती. भारताचा नेमका काय गेमप्लान सुरू आहे याची काहीच कल्पना नाही. पण संघ पूर्णपणे हरवला आहे इतकं नक्की", असं शोएब अख्तर म्हणाला.
"भारतीय संघ वर्ल्डकप खेळायला आला आहे असं वाटतंच नाहीय. खूप सरासरी खेळ सुरू आहे. भारतीय माध्यमांमध्ये संघाबाबत ज्यापद्धतीनं हवा करुन ठेवण्यात आली आहे. ते पाहता संघ नक्कीच खूप कठीण काळातून जातोय याची कल्पना आहे. पण याही वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची गोलंदाजी बाजू खूप कमकुवत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे", असं शोएब अख्तर म्हणाला.