अबुधाबी : यूएईत सलग सहा पराभवानंतर मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळाला. कर्णधार रोहित शर्माची दमदार फलंदाजी आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईला हा विजय साकारता आला. ‘संयुक्त अरब अमिरातीच्या उष्ण आणि दमट वातावरणात खेळणे सोपे नाही. या वातावरणात शरीरातील बरीच ऊर्जा खर्च होते. डावाच्या अखेरीस मी दमलो होतो. आमच्यासाठी एक धडा आहे, सेट झालेल्या फलंदाजाने अखेरपर्यंत फलंदाजी केली पाहिजे,’ असे रोहितने सामन्यानंतर सांगितले.
रोहितने मधल्या षटकात पूलचा शिताफीने वापर करीत काही षटकार लगावले. याविषयी विचारताच तो म्हणाला, ‘कुठला एक फटका निवडता येणार नाही. माझे सगळेच फटके चांगले लागले. एकूणच संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे.’‘मागच्या सहा महिन्यात क्रिकेट खेळायला मिळाले नव्हते. पहिल्या सामन्यात चांगला खेळ झाला नव्हता, मात्र केकेआरविरुद्ध सूर गवसल्याचा आनंद आहे,’ असे सर्वाधिक १८ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या रोहितने सांगितले. केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याने फलंदाजी अािण गोलंदाजीत सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचे सांगितले.
गोलंदाजीच्या वेळी वानखेडे स्टेडियम डोळ्यापुढे ठेवून मारा केला. वेगवान गोलंदाजांसाठी वातावरण पूरक होते. ट्रेंंट बोल्ट किंवा जेम्स पॅटिन्सन यांच्यासोबत आम्ही अधिक खेळलो नव्हतो. तरीही येथे ताळमेळ राखण्यात यश आले. पहिल्या सहा षटकानंतरच सामना आमच्या बाजूने झुकल्याचे चित्र होते.