Join us  

आधी पाऊस, मग एल्गर बरसला; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

वॉंडरर्सवर भारताचा पहिल्यांदाच पराभव, मालिकेत बरोबरी; मंगळवारी पुढचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 5:38 AM

Open in App

जोहान्सबर्ग : कर्णधार डीन एल्गर (९६ धावा) याच्या शानदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यात सात गडी राखून पराभूत केले. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे चहापानानंतरच सुरू झाला. मात्र पहिल्या षटकापासूनच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वर्चस्व राखले आणि २४० धावांचे लक्ष्य सहज गाठले. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

भारताने आपल्या पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने २२९ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद २६६ धावा केल्या होत्या. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात गुरुवारी पावसाच्या व्यत्ययाने उपहारापर्यंत खेळ सुरू होऊ शकला नव्हता. त्यानंतर चहापानानंतर खेळाला सुरुवात झाली. दिवसाच्या तिसऱ्या षटकापासूनच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी फटकेबाजीला सुरुवात केली. बुमराहच्या या षटकात ९ धावा गेल्या. त्यानंतर प्रत्येक षटकासोबतच आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावगती वाढवली. वॅन डर डुसेन (४० धावा) याला शमीने बाद केले. मात्र त्याचा फरक एल्गरवर पडला नाही. ५७ व्या षटकांत बावुमाचा झेल शार्दुल ठाकूरने त्याच्याच चेंडूवर सोडला. त्यानंतर एल्गरने ६५ व्या षटकात सिराजला तीन चौकार लगावत १८ धावा वसूल केल्या. तेम्बा बावुमा याने २३ धावा केल्या. सिराज महागडा ठरत असल्याचे पाहून कर्णधार के.एल. राहुल याने अश्विनला गोलंदाजी दिली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

एल्गरने १५८ चेंडूत ९६ धावांची खेळी केली. त्यात एल्गरने १० चौकार लगावले, तर रॅस्सी व्हॅन डुर डुसेन याने ९२ चेंडूत ४० धावांची खेळी करत एल्गरला चांगली साथ दिली. मात्र शमीने त्याला बाद केल्यावर आलेल्या तेम्बा बावुमानेही संयमाने खेळी करत संघाला विजय साकारून दिला. त्याने ४५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या.

चौथ्या दिवशी फक्त ३४ षटकांचाच खेळ होणार होता. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकेने सहा षटके शिल्लक असतानाच सामना संपवला. चौथ्या दिवशी विजयासाठी १२२ धावांची गरज असताना एल्गर, डुसेन आणि बावुमा यांनी भारतीयांवर वर्चस्व गाजवले. ही मालिका बरोबरीत असून पुढचा कसोटी सामना ११ जानेवारी रोजी केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे.

भारताचा गड पडला...n भारतावरील या विजयाचा नायक राहिला तो डीन एल्गर, त्यालाच सामनावीराचा बहुमान देण्यात आला.  जोहान्सबर्गच्या वाँडरर्स या मैदानाला भारताचा परदेशातील अभेद्य किल्ला संबोधले जाते. मात्र मायदेशातील परिस्थितीचा आणि पावसाचा फायदा घेत डीन एल्गरच्या खेळीने हा किल्ला देखील पडला. n भारत या जोहान्सबर्गच्या या मैदानात पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पराभूत झाला आहे.  या सामन्यानंतर बोलताना भारताचा कर्णधार के.एल. राहुल याने सांगितले की, आम्ही पहिल्या डावात खूपच कमी धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात रहाणे आणि पुजाराने पुनरागमन करून दिले होते.  n दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने सांगितले की, आमचे गोलंदाज चांगले राहिले. विजयासमोर दुखापतीबाबत बोलणार नाही.’

धावफलकभारत पहिला डाव : सर्वबाद २०२,द. आफ्रिका पहिला डाव : सर्वबाद २२९.भारत दुसरा डाव: सर्वबाद २६६ धावा.द. आफ्रिका दुसरा डाव : एडन मार्कक्रम पायचित गो. ठाकूर ३१, डीन एल्गर नाबाद ९६, किगन पीटरसन पायचित गो. अश्विन २८, रॅसी व्हॅन दर दुसेन झे. पुजारा गो. शमी ४०, तेम्बा बवूमा नाबाद २३ अवांतर - २५, एकूण : ६७.४ षटकांत ३ बाद २४३. गडी बाद क्रम : १-४७, २-९३, ३-१७५. गोलंदाजी : जसप्रीत बुमराह १७-२-७०-०, मोहम्मद शमी १७-३-५५-१, शार्दुल ठाकूर १६-२-४७-१, मोहम्मद सिराज ६-०-३७-०, रविचंद्रन अश्विन ११.४-२-२६-१.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App