- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
टी-२० विश्वचषकाचा पहिला आठवडा संमिश्र ठरला. इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांनीे दमदार विजयांची नोंद केली, तर वेस्ट इंडिज, भारत आणि न्यूझीलंड या दावेदारांनी निराशा केली. स्पर्धेची सुरुवात तशी खळबळजनक झाली. भारत आणि विंडीज यांना सलामीला पराभव पत्करावा लागला. विंडीजचा इंग्लंडने ५५ धावात खुर्दा केला, तर पाकने भारताला दहा गड्यांनी नमविले. टी-२० अनपेक्षित प्रकार असला तरी, भारत, विंडीजचा पराभव नामुष्कीचाच होता.
भारत - पाक सामन्याची चर्चा होणे समजू शकतो. क्रिकेटमधील शत्रुत्व चाहते आणि दोन देशात असले तरी, त्याला अवास्तव महत्त्व दिले जाते. अशा वातावरणात उभय संघांतील खेळाडूंवर दडपण येणे स्वाभाविक म्हणावे लागेल. हा एकतर्फीे सामना दोन्ही संघांच्या खिलाडूवृत्तीने गाजला. कोहलीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचे सर्वप्रथम कौतुक केले. प्रतिस्पर्धी खेळाडूंकडूनहीे भारताला मोठा सन्मान मिळाला.
दुर्दैवाने दोन्ही सीमेपलीकडील काही तत्त्वांनी कुरघोडी केली. सोशल मीडियावर झालेला चाहत्यांचा असभ्यपणा अतिशय निंदनीय होता. मोहम्मद शमीच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेण्यात आला.
यावर सचिन, गंभीर, सेहवाग या माजी दिग्गजांनी शमीला पाठिंबा देत त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. बीसीसीआयने देखील शमीच्या पाठीशी उभे राहणारे ट्वीट केले. पण सध्याच्या संघातील एकही सहकारी त्याच्या पाठीशी उभा राहिला नाही, याचे आश्चर्य वाटते.
आपणही ट्रोल होऊ, अशी त्यांना भीती वाटत असावी. शमीला संपूर्ण संघाकडून एकमुखी पाठिंबा अपेक्षित होता.
भारत - न्यूझीलंडसाठी रविवारचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. यात विजय मिळविणारा संघ उपांत्य फेरीकडे कूच करेल, तर पराभूत संघाची वाट कठीण होईल. ग्रुप दोनमधून पाकने आधीच उपांत्य फेरी गाठली. अफगाण संघ इतरांना धक्के देण्याइतपत सक्षम आहेच. अनेक अर्थांनी भारत - न्यूझीलंड सामना निर्णयक ठरेल.
n सीमेपलीकडूृनही राजकीय आणि धर्मांध वक्तव्ये झाली. राजकारण्यांच्या आक्रोशपूर्ण वर्तनाचे आश्चर्य वाटले नाही, पण पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने घृणास्पद, असंवेदनशील आणि निंदनीय, जातीयवादी विधाने करणे धक्कादायक होते. वकार भारताविरुद्ध अनेक वर्षे खेळला. भारतात त्याला मोठा सन्मान आणि प्रशंसा लाभली. त्याच्यासारख्या महान खेळाडूने अशाप्रकारची खालच्या पातळीवरील वक्तव्ये करावीत, याचे वाईट वाटते. नंतर त्याने माफी मागितली, पण कडवटपणा विसरता येणे शक्य नाही.
n भारत - पाक क्रिकेट हे सर्वांत उत्कंठापूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटसारख्या माध्यमाचा उपयोग होऊ शकतो असे वाटत असेल, तर जबाबदार लोकांना अधिक खबरदारी घ्यावीच लागेल.
Web Title: It is rude to doubt Mohammad Shami's patriotism!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.