भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. एक यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु त्यालादेखील संघात येण्यासाठी किती आटापिटा करावा लागला होता याचा खुलासा एका कार्यक्रमादरम्यान माजी निवडसमिती प्रमुख किरण मोरे यांनी केला आहे. "आम्हाला यष्टीरक्षक आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिका साकारणाऱ्या एका खेळाडूची गरज होती. त्यावेळी फॉर्मेट बदलत होता. आम्हाला एक पॉवर हिट फलंदाज हवा होता. असा एक खेळाडू जो सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊनही ४०-५० धावा करू शकेल. राहुल द्रविडनं यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ७५ सामने खेळले होते. २००३ च्या विश्वचषक सामन्यातही त्यानं फलंदाजी केली होती. अशात आम्हाला एका यष्टीरक्षकाची गरज होती," असं मोरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं."माझ्या एका सहकाऱ्यानं पहिल्यांदा महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याला खेळताना पाहिलं. त्यानंतर मी त्याचा खेळ पाहण्यासाठी गेलो. संपूर्ण संघानं १७० धावा केल्या होत्या. त्यातील १३० धावा या धोनीच्याच होत्या. त्यानं सर्व गोलंदाजांना समोर गुडघे टेकण्यास भाग पाडलं होतं. धोनी हा अंतिम सामन्यात यष्टीरक्षक म्हणून खेळावा अशी आमची इच्छा होती," असं मोरे यांनी सांगितलं.महेंद्र सिंग धोनीला केनिया दौऱ्यावर भारताच्या 'अ' संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. ज्या ठिकाणी त्यानं सात सामन्यांमध्ये दोन शतकं आणि आणखी एका शतकाच्या मदतीनं सामन्यात ३६२ धावांचा डोंगर उभा केला होता. "त्यावेळी आमची सौरव गांगुली आणि दीपदास गुप्ता यांच्याशी चर्चा झाली. दीपदास गुप्ता त्यावेळी खेळत होता आणि तो कोलकात्यातूच होता. अशा परिस्थितीत सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला समजवण्यात १० दिवस गेले की यष्टीरक्षक म्हणून दीपदास गुप्ता ऐवजी धोनीला जबाबदारी द्यावी," असं किरण मोरे म्हणाले.
"तुम्हाला एखाद्या व्यक्तीसाठी संधी निर्माण करावी लागते आणि ते मॅच विनरप्रमाणे वाटतात. धोनी एका पॅकेज प्रमाणे होता. त्याला फक्त एका संधीची आवश्यकता होती. हा एकप्रकारचा जुगारच आहे. तुम्ही योग्य व्यक्तीवर दाव लावला पाहिजे. आम्ही योग्य व्यक्तीवर दाव लावला. आम्ही त्या दिवशी स्वत:साठी गेम जिंकलो," असंही ते म्हणाले.