Join us  

टीम इंडिया पाकिस्तानात येऊन खेळणार हे दिवसा स्वप्न पाहण्यासारखं; पाक क्रिकेटरचं ट्विट चर्चेत

पाक क्रिकेटरनं या ट्विटमधून टीम इंडियाला टोला तर मारलाच आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही कान टोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 6:27 PM

Open in App

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत नियोजित आहे. पण या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास टीम इंडिया राजी नाही. बीसीसीआयनं यासंदर्भात आयसीसीकडे आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. आशिया चषक स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलसह व्हावे, यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यासाठी तयार नाही. या प्रकरणात आयसीसी सध्या वेट अँण्ड वॉच भूमिकेत दिसते. त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. दरम्यान या प्रकरणात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद हाफिझ याच्या ट्विटनं लक्षवेधून घेतलं आहे.

मोहम्मद हाफिझनं ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

मोहम्मद हाफिझनं ट्विटमध्ये लिहिलंय की,, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात येईल ही गोष्ट दिवसा स्वप्न पाहिल्यासारखी होती. पाकिस्तान ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी सुरक्षित आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा संघ अनेक संघांचा पाहुणचार करत आहे. पण भारतीय संघाला  इथं असुरक्षित का वाटते माहिती नाही. आता पाकिस्तान सरकार आणि पीसीबी कडून कठोर आणि आश्चर्यचकित करुन टाकणाऱ्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहे." असा उल्लेख त्याने आपल्या ट्विटमध्ये केल्याचे दिसते.

टीम इंडियाला टोला अन् PCB चं टोचले कान

पाक क्रिकेटरनं या ट्विटमधून टीम इंडियाला टोला तर मारलाच आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही कान टोचले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकमध्ये खेळेल, अशी चर्चा रंगताना पाहायला मिळाले होते. पीसीबीनं रविवारी पुष्टी केलीये की, भारतीय संघानं आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानात येण्यास नकार दिला आहे.  

PCB चा पुढचा प्लान काय? 

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघानं पाकिस्तान खेळण्यास नकार दिल्यानंतर PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी हे सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ या प्रकरणात कोणत्या सूचना देणार यावर पुढच्या हालचाली केल्या जातील. भारतीय संघाची भूमिका  ही पटण्याजोगी नाही. पाकिस्तान दौऱ्याला नकार देण्यात त्यांच्याकडे कोणतेही तार्किक कारण नाही, असेही संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानमोहम्मद हाफीज