Join us  

"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

जितेश शर्मा; कर्णधारपद उशिराने मिळाले, यात विशेष काही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 5:22 PM

Open in App

- रोहित नाईक 

मुंबई : 'आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव चांगला होता. स्पर्धेच्या आधी झालेल्या कर्णधारांच्या फोटोशूटसाठी मी गेलो खरे; पण शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाचे नेतृत्व सॅम करनकडे सोपविण्यात आले. पंजाब संघाने उपकर्णधारपदाबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यामुळे संघाने दिलेल्या जबाबदारीनुसार आम्ही आमची भूमिका निभावली,' असे पंजाबचा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मा याने 'लोकमत'ला सांगितले.

यंदाच्या सत्रात पंजाबची कामगिरी निराशाजनक झाली आणि त्यांना गुणतालिकेत नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या आधी झालेल्या कर्णधारांच्या फोटोशूटसाठी पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवनच्या अनुपस्थितीत जितेशने हजेरी लावली. त्यामुळे तो संघाचा उपकर्णधार असल्याचा सर्वांचा समज झाला. मात्र, पंजाबने आपल्या उपकर्णधाराची कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती, असे जितेशने म्हटले. अखेरच्या सामन्यात  जितेशने संघाचे नेतृत्व केले होते. 

याबाबत तो म्हणाला की, 'पंजाबचा कर्णधार म्हणून खूप चांगला अनुभव होता. या भूमिकेसाठी मी उत्सुक होतो. मला आव्हानांना सामोरे जाण्यास आवडतं. आव्हानांचा सामना करताना चांगली कामगिरी करण्याची स्फूर्ती मिळते. स्पर्धेआधी कर्णधारांच्या फोटोशूटला मी गेलो, पण नंतर सॅम करनकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता, यामध्ये विशेष काही नव्हते.'

धवनच्या दुखापतीबाबत त्याने सांगितले की, 'शिखर धवनची दुखापत आमच्यासाठी नुकसानकारक ठरली. त्याच्याकडे खूप मोठा अनुभव असून प्रत्येक खेळाडूला त्याचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे आम्हाला धवनच्या अनुभवाची कमतरता जाणवली.' त्याचप्रमाणे, 'पंजाबने काही सामने अंतिम क्षणी गमावले. ते सामने जिंकले असते, तर आम्ही प्ले ऑफमध्ये प्रवेश केला असता,' असेही जितेशने सांगितले

टॅग्स :पंजाब किंग्सआयपीएल २०२४शिखर धवन