नवी दिल्ली : ‘वरिष्ठ खेळाडू मिताली राजला महिला टी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वगळण्यात आल्याच्या वादग्रस्त निर्णयावर अनेक चर्चा सुरू आहेत. साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या भारतीय संघासाठी तो दिवसच वाईट होता,’ असे मत क्रिकेट प्रशासकांच्या समितीच्या सदस्य डायना एडुल्जी यांनी सोमवारी व्यक्त केले. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत मितालीला वगळण्यात आल्यानंतर वाद झाला. भारताला त्या लढतीत ८ विकेट््सने पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार एडुल्जी म्हणाल्या, ‘सुतळीचा साप बनविण्यात येत आहे. संघ व्यवस्थापनाने (कर्णधार हरमनप्रीत कौर, प्रशिक्षक रमेश पोवार, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि निवड समिती सदस्य सुधा शाह) विजयी संयोजन कायम राखण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. भारत जिंकला असता तर यावर कुठलाही प्रश्न उपस्थित झाला नसता. आम्ही अंतिम ११ खेळाडूंच्या संघावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. कृणाल पांड्याचे उदाहरण बघा. पहिल्या टी२० सामन्यात तो महागडा ठरला, पण रविवारी त्याने शानदार पुनरागमन केले. खेळामध्ये हे सर्व घडत असते.’
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीत बाहेर असलेली मिताली गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळण्यासाठी उपलब्ध होती. तिने साखळी फेरीत आयर्लंड व पाकिस्तानविरुद्ध ५१ व ५६ धावांची खेळी केली होती. हरमनप्रीतवर टीका करताना मितालीची व्यवस्थापक अनिशा गुप्ता म्हणाली होती, ‘मिताली राजकारण व पक्षपातीपणाची बळी ठरली आहे.’
एडुल्जी म्हणाल्या, ‘अशा प्रकारच्या वक्तव्याची कुठली गरज नव्हती. भारतासाठी तो दिवस वाईट होता. फलंदाज अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजी करताना दवाचा प्रभाव जाणवला. उपांत्य फेरीत अशा प्रकारची कामगिरी अपेक्षित नव्हती.’दरम्यान, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्यासोबत सध्यातरी सीओएची कुठल्याही प्रकारची बैठक होत नसल्याचे डायना एडुल्जी यांनी यावेळी स्पष्ट केले.मिताली व हरमनप्रीत जोहरी व करीम यांना वेगवेगळ्या भेटल्याभारतीय महिली टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज यांनी सोमवारी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत संघ निवडीबाबत आपापले मत मांडले.भारताला विश्व टी२० अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य लढतीत इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर संघनिवडीबाबत वाद झाला. मिताली तंदुरुस्त असल्यानंतरही तिला वगळण्यात आले आणि हरमनप्रीतने रविवारी ८ बळींनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही निर्णय योग्य असल्याचे म्हटले होते.