सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चर्चेचा विषय ठरत आहे. कारण भारतीय संघात सध्या यष्टीरक्षणाबाबत काही प्रयोग सुरु आहेत. त्यामुळे आता यापुढे धोनी खेळणार की निवृत्ती घेणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पण दुसरीकडे मात्र धोनीने सरावाची तारीख ठरवली आहे. येत्या काही दिवसांमध्येच धोनी तुम्हाला सराव करताना दिसू शकेल.
धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. पंतला बऱ्याच संधी देण्यात आल्या. पण या संधीचा फायदा पंतला घेता आला नाही. त्यामुळे पंत सध्या संघाच्या बाहेर आहे. सध्याच्या घडीला भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी लोकेश राहुलवर सोपवण्यात आली होती. पण आता कसोटी मालिकेत पुन्हा एकदा पंतला स्थान देण्यात आले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात राहुल आणि वृद्धिमान साहा या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवत पंतला संघात कसे स्थान दिले, यावर आता चाहते सवाल विचारत आहेत.
धोनीला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरागमन करायचे असेल, तर त्याला एक गोष्ट निश्चितच करावी लागेल. धोनीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. आयपीएलमध्ये धोनीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धोनीला सेंट्रल करार न देऊन बीसीसीआयनं जेवढे सामने खेळाल, तेवढंच मानधन मिळेल असे संकेत दिले आहेत. करारामधून वगळले म्हणजे धोनी भारताकडून खेळू शकत नाही, असा याचा अर्थ होत नाही.
बीसीसीआयने जाहीर केलेला करार हा सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी बीसीसीआयचे नवीन करार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनी हा आगामी करारामध्ये आपल्याला दिसू शकतो.
धोनीने आता आयपीएलवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे धोनीने आयपीएलच्या सरावाची तारीखही ठरवली आहे. धोनी २ मार्चला आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सरावासाठी मैदानात उतरणार आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे होम ग्राऊंड असलेल्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर २ मार्चपासून सरावाला सुरुवात करणार आहे.