- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
हार्दिक पांड्याकडेमुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. दहा वर्षे नेतृत्व करणारा रोहित शर्मा यापुढे मुंबई संघात तर असेल. मात्र, कर्णधारपद सांभाळू शकणार नाही. यात काही गुपित किंवा आश्चर्य असावे, असे वाटत नाही. हार्दिक गुजरात सोडून पुन्हा मुंबईकडे परतणार ही चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच सर्वांना कळले होते. त्यामुळे काहीही लपून राहिले नव्हते. हार्दिक मुंबईकडे येणार असेल तर कर्णधारपद मिळणारच हेदेखील ठरले होते.
हार्दिकने गुजरातचे नेतृत्व करीत जेतेपद मिळवून दिले. त्यामुळे मी मुंबईत येणार असेल तर कर्णधार म्हणूनच येईन, ही अट ठेवण्याची क्षमता त्याच्याकडे होतीच. १५ कोटी मिळाले ही बाब वेगळी, पण पैशांसोबतच दर्जा मिळाला नसता तर पुढे भारतीय टी-२० संघाचा कर्णधार होण्याचा त्याचा मार्ग कुठेतरी अडखळला असता. हार्दिक आणि मुंबई संघात देवाण-घेवाणीची चर्चा वनडे विश्वचषकाआधीपासून सुरू होती, असे बोलले जात आहे.
हार्दिक वनडे विश्वचषकात रोहितच्या नेतृत्वाखालील संघात होता, रोहितने पुढे येऊन नेतृत्व केले आणि वैयक्तिक योगदानही दिले. दरम्यान, हार्दिक जखमी होऊन बाहेर पडल्यानंतरही हार्दिकसोबतची मुंबई संघाची बोलणी सुरूच होती. रोहितला देखील याची कल्पना असावी. त्याच्या पाठीमागे हे सर्व सुरू होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. नेतृत्वाच्या मुद्द्यावर मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने त्यावेळी हार्दिकशी चर्चा केली असावी, पण घोषणा केली नाही. आधी केवळ खेळाडू म्हणून मुंबईकडे ओढण्याचे सोपस्कार पार पडले.
धक्कातंत्र योग्य नव्हते...माझ्या मते, हार्दिकच्या कर्णधारपदाची घोषणा इतकीही औपचारिक व्हायला नको होती. प्रसिद्धिपत्रकानुसार ही घोषणा योग्य नव्हती. पाचवेळा जेतेपद मिळवून नेणाऱ्या रोहितचे कौतुक करीत त्याला हटविणे योग्य नव्हते. काॅर्पोरेटचे धोरण असेच असते असे मानले तर मुंबईसाठी संघासाठी मागची तीन वर्षे चांगली झाली नव्हती. रोहितचेही वय वाढत होते. त्यामुळे मुंबईने भविष्याचा विचार करीत ३० वर्षांच्या हार्दिकला कर्णधार बनविले असावे, पण ही घोषणा रोहितला धक्का देणारी ठरली. अनुभवी आणि पाचवेळेच्या विजेत्या कर्णधाराला इतक्या सहजपणे दूर सारायला नको होते.
अनुभवी खेळाडूही हवे... ३६ वर्षांचा रोहित आतादेखील तीनही प्रकारात खेळण्याची क्षमता बाळगतो. रिंकू, यशस्वी, ऋतुराज यांच्यासारखे युवा खेळाडू काहीच प्रकारात खेळू शकतात, पण रोहित आणि विराट यांच्यात तिन्ही प्रकारांत खेळण्याची क्षमता कायम आहे. टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडीस वेळ आहे, पण मी आज संघ निवडत असेन तर माझ्या संघात विराट आणि रोहित दोघेही राहतील. टी-२० साठी युवा खेळाडू असावेत हे मान्य आहे, पण अनुभव आणि सामन्यातील परिस्थितीची ओळख करण्यासाठी विराट आणि रोहितसारख्यांची गरज आहे. हार्दिकपुढे जबाबदारी आणि आव्हाने असतील. खेळाडू या नात्याने त्याने स्वत: कामगिरी करायला हवी. शिवाय कर्णधार म्हणून सहकाऱ्यांमध्ये एकोपा वाढविण्यावर भर द्यावा. रोहितने ही जबाबदारी चाणाक्षपणे पार पाडली. हार्दिकची कसोटी कारकीर्द जवळपास संपली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. या स्थितीत तो फिटनेस कायम राखण्यात अपयशी ठरला नाही, तर मात्र प्रश्न वाढतच जातील.