अहमदाबाद : भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमान गिल याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील थरारक अनुभव कथन केले. ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पणात जणू काही युद्धासाठी जात असल्याचा भास होत होता, असे मत या उदयोन्मुख फलंदाजाने गुरुवारी मांडले.ऑस्ट्रेलियाचा दौरा २१ वर्षीय गिलसाठी चांगला ठरला. तेथे त्याने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतकांसह २५९ धावा केल्या. भारतीय संघाने दुखापतीच्या समस्यांचा सामना केल्यानंतरही ही मालिका २-१ने जिंकली. गिलने मेलबोर्नमध्ये दुसऱ्या कसोटीदरम्यान पदार्पण केले. गिलने आयपीएल फ्रँचाइजी कोलकाता नाइट रायडर्सच्या अधिकृत वेबसाईटवर दौऱ्यातील अनुभव कथन केले. तो म्हणाला, ‘‘जोपर्यंत क्षेत्ररक्षण करीत होतो तोपर्यंत मी खूप सामान्य होतो. जेव्हा फलंदाजीची वेळ आली, तेव्हा प्रेक्षकांच्या आवाजादरम्यान (ऑस्ट्रेलियाच्या समर्थनार्थ) ड्रेसिंग रूमपासून खेळपट्टीवर येत होतो, तेव्हा हा वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. असे वाटत होते जसे की मी युद्धासाठी जात आहे.’’
सामना सुरू होण्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जेव्हा गिल याला ‘टेस्ट कॅप’ सोपवली तेव्हा तो भावनाप्रधान झाला होता. गिल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत मोठी खेळी करू शकला नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील आपल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याने आपल्याला भारतीय क्रिकेटचा भावी स्टार खेळाडू का मानले जाते हे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियात पदार्पणाविषयी विचारताच गिल म्हणाला, ‘‘ भारतीय संघात स्थान मिळणे हे बालपणी पाहिलेले स्वप्न साकार होण्यासारखेच होते. मी लहान असताना ऑस्ट्रेलियातील कसोटी सामना पाहण्यासाठी पहाटे साडेचार-पाच वाजता उठत होतो. आता क्रिकेट चाहते मला खेळताना पाहण्यासाठी लवकर उठतात, ही छान भावना आहे. मला आताही स्मरण आहे की, ऑस्ट्रेलियात मालिका पाहण्यासाठी माझे वडील व मी लवकर उठत होते. ब्रेट ली याला गोलंदाजी आणि सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना पाहणे वेगळ्याप्रकारची अनुभूती होती.”
कोणत्याही स्थितीत हार मानू नका!ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून काय शिकवण घेतली, याविषयी गिल म्हणाला, ‘‘कोणत्याही व कशाही परिस्थितीत तुम्ही हार मानू शकत नाही. आमच्या संघात खूप खेळाडू जखमी होतेे, परंतु ड्रेसिंग रूममधील सकारात्मकता कधी बदलली नाही. अनेक समस्यांना तोंड देत आम्ही मालिका जिंकली. यादरम्यान प्रत्येक सामन्यात युवा आणि अनुभवी खेळाडूंपैकी कुणी ना कुणीतरी योगदान देत संघाला सावरले. माझ्यासारख्या युवा खेळाडूंना संघातील दिग्गजांनी जी प्रेरणा दिली त्याबळावर मी पदार्पण यशस्वी करू शकलो.’’