नवी दिल्ली - सुरुवातीच्या सामन्यांमधील संघाच्या सुमार कामगिरीनंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता गंभीरने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत मोठा गौप्यस्फोट केला असून, कुणाच्या दबावामुळे किंवा सांगण्यामुळे नव्हे तर संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मी स्वत:; कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, असले म्हटले आहे.
आपल्या निर्णयाबाबत टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गंभीरने सांगितले की, ''सहा सामन्यांत केवळ 85 धावांचेच योगदान देऊ शकल्याने मी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सांभाळणे योग्य आहे, असे मला वाटत नाही. कर्णधारपद सोडण्याची हीच वेळ असल्याचे मला वाटते. माझ्यावर कप्तानी सोडण्यासाठी दबाव आणण्यात आलेला नाही. मात्र तडकाफडकी निवृत्ती स्वीकारण्याची कोणतीही योजना माझ्या मनात नाही."
आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये दिल्लीच्या संघात परतलेल्या गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्ली डेअरडेव्हिल्सला पहिल्या सहा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर या पराभवांची जबाबदारी घेत गौतमने दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला होता. गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली होती.
आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या दिल्लीचा संघ पाच पराभवांसह तळाला आहे. तसेच या सत्रात गौतम गंभीरला लौकीकास साजेशी खेळ करता आला नाही. सहा सामन्यात त्याला फक्त 85 धावा करता आल्या आहे. त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.
Web Title: It was my own decision to step down - Gautam Gambhir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.