Join us  

सचिनच्या भावानेच पुतळ्याच्या चेहऱ्याला दिली पसंती; खुद्द शिल्पकाराने टीकाकारांना दिलं प्रत्युत्तर

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 7:52 PM

Open in App

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झाले. एकूण २२ फूट उंचीचा असलेला सचिनचा हा पुतळा सरळ दिशेने हवेत फटका मारतानाच्या शैलीत आहे. विजय मर्चंट स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा बसविण्यात आला असून संपूर्ण पुतळा ब्राँझचा आहे. या पुतळ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पुतळ्यातील चेहरा सचिनसारखा कमी आणि ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फलंदाज स्टीव्ह स्मिथसारखा दिसतो. यानंतर पुतळा आणि स्मिथचा फोटो यावर बनवलेले मीम्स व्हायरल झाले आहेत.

हा पुतळा प्रसिद्ध कलाकार प्रमोद कांबळे यांनी साकारला आहे. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या सजावटीच्या कामाचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. सचिनच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादावर आज कलाकार प्रमोद कांबेळ यांनी प्रतिक्रिया दिली.

४० धावांत ५ विकेट्स! सर जडेजाचा अविश्वसनीय चेंडू; विराटचा डान्स अन् शाहरूखची ट्रेडमार्क पोज, Video 

प्रमोद कांबळे म्हणाले, मी ६-७ महिने पुतळ्यावर काम केल्यानंतर, ते फायनल होण्यापूर्वी सचिन तेंडुलकर यांचा भाऊ अजित तेंडुलकर अहमदनगर स्टुडिओत आले होते. हा पुतळा सचिनच्या चेहऱ्याशी तंतोतंत जुळतो असे त्यांनी यावेळी म्हटले होते. आता मला कळत नाही की लोक चेहऱ्याची चेष्टा का करत आहेत. पुतळा पाहिल्यानंतर अजित तेंडुलकर यांनी अशा अनेक बारीकसारीक गोष्टी सांगितल्या ज्यामुळे पुतळ्याच्या सौंदर्यात भर पडली. सचिनच्या पायाचा कोन काय आहे, हात कुठे आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह खेळताना तो किती वाकलेला आहे हे त्यांनी सांगितले होते.

यावेळी सचिनलाही हा पुतळा खूप आवडल्याचे कांबळे यांनी सांगितले. त्याने हा पुतळा फोटोत पाहिला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशन असो किंवा सचिनचे कुटुंब असो, कुठूनही हा पुतळा सचिनचा नसून दुसऱ्याचा आहे, असे समोर आले नाही. या पुतळ्याबद्दल लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतील, पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका, असेही अजित तेंडुलकर म्हणाले होते.

कांबळे यांनी सांगितले की, यापूर्वी सचिनची २०० धावा पूर्ण केल्यानंतर आकाशाकडे पाहत असल्याची पोझ घ्यायची होती. पण, यानंतर क्रिकेट खेळताना त्याची काही अॅक्शन पोज घ्यायची असे ठरले. अखेरीस, लॉफ्टेड ड्राईव्ह पोझ वर सेटल झाला, यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्त्वासारखीच उंची होती. त्याला चेंडूवर उभे असल्याचे दाखवण्याची माझी कल्पना होती. आयुष्यभर त्याने बॅटने चेंडूला दिशा दाखवली आहे, असंही कांबळे म्हणाले. 

टॅग्स :ऑफ द फिल्डसचिन तेंडुलकर