विश्वचषक संघाला अंतिम रूप देण्यास वेळ लागेल; टी-२० स्पर्धेसाठी बराच अवधी

रोहित शर्मा ; शनिवारी संपलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेनंतर रोहित म्हणाला, ‘टी-२० विश्वचषक स्पर्धेला अद्याप बराच वेळ शिल्लक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:01 AM2021-03-22T03:01:35+5:302021-03-22T07:17:37+5:30

whatsapp join usJoin us
It will take time for the World Cup team to finalize; Lots of time for T20 tournament | विश्वचषक संघाला अंतिम रूप देण्यास वेळ लागेल; टी-२० स्पर्धेसाठी बराच अवधी

विश्वचषक संघाला अंतिम रूप देण्यास वेळ लागेल; टी-२० स्पर्धेसाठी बराच अवधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : ‘आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाचा फलंदाजी क्रम निश्चित करणे घाईचे ठरेल आणि कर्णधार विराट कोहलीचे इंग्लंडविरुद्ध अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात माझ्यासोबत डावाची सुरुवात करणे केवळ रणनीतीचा भाग होता,’ असे मत भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. याआधी कोहलीने म्हटले होते की, तो आगामी आयपीएलमध्येही डावाची सुरुवात करणार असून, यंदा वर्षअखेर भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही सलामीला खेळण्यास उत्सुक राहील. 

शनिवारी संपलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेनंतर रोहित म्हणाला, ‘टी-२० विश्वचषक स्पर्धेला अद्याप बराच वेळ शिल्लक आहे. त्यावेळी आमची फलंदाजी कशी असेल, यावर मत नोंदविणे घाईचे ठरेल. संघासाठी सर्वांत अनुकूल काय आहे, हे आम्हाला चर्चा करून ठरवावे लागेल.’

तो पुढे म्हणाला, ‘कोहलीने डावाची सुरुवात करणे रणनीतीचा भाग होता. कारण आम्ही अतिरिक्त गोलंदाजाला संघात स्थान देण्यास इच्छुक होतो. त्यामुळे एका फलंदाजाला वगळावे लागणार होते. दुर्दैवाने लोकेश राहुलला बाहेर बसावे लागले. हा कठीण निर्णय होता. राहुल मर्यादित षटकांच्या विशेषत: टी-२० मध्ये आमचा प्रमुख खेळाडू आहे. सध्याचा फॉर्म बघता संघ व्यवस्थापनाने सर्वश्रेष्ठ एकादशसह उतरण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ असा नाही की भविष्यात राहुलचा विचार होणार नाही. हा केवळ एका सामन्यासाठीच निर्णय होता.’
मालिकेपूर्वी कोहलीने म्हटले होते की, रोहित व राहुल त्याच्या पहिल्या पसंतीची सलामी जोडी आहे. रोहित म्हणाला, ‘आम्ही राहुलची क्षमता व आघाडीच्या फळीतील त्याचे योगदान समजून आहोत.’ विश्वचषक स्पर्धेसाठी अद्याप बराच कालावधी शिल्लक आहे. त्याआधी आयपीएल होणार असून, त्यापूर्वी काही टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही होणार आहेत. त्यामुळे सर्वश्रेष्ठ संभाव्य एकादश कुठली असेल हे जाणून घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ आहे.’ कोहली त्याच्यासोबत नियमितपणे डावाची सुरुवात करण्याबाबत रोहित म्हणाला, ‘या लढतीत आमच्यासाठी हा फलंदाजी क्रम उपयुक्त ठरला, पण सर्वकाही त्यावेळी कर्णधार काय विचार करतो, यावर अवलंबून राहील.’

भुवनेश्वर प्रमुख गोलंदाज
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरत यशस्वी पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला, हे भारतासाठी चांगले वृत्त आहे. त्याने निर्णायक लढतीत धोकादायक जोस बटलरला बाद करीत भारताला वर्चस्व मिळवून दिले होते. 
रोहित म्हणाला, ‘भुवनेश्वर प्रदीर्घ कालावधीपासून संघात आहे. त्याने टी-२० मध्ये आमच्यासाठी निश्चितच चांगली कामगिरी केली आहे. तो अद्याप आमचा प्रमुख गोलंदाज आहे आणि या क्रमामध्ये तो निश्चितच आमचा मुख्य गोलंदाज आहे.’

Web Title: It will take time for the World Cup team to finalize; Lots of time for T20 tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.