आयसीसी वन डे विश्वचषकात अफगाणिस्ताननेपाकिस्तानचा पराभव करून इतिहास रचला. वन डे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानला ही कामगिरी करण्यात यश आले. अफगाणिस्तानने चालू विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये दोन बड्या संघांना पराभूत करून खळबळ माजवली. प्रथम विश्वविजेत्या इंग्लंडला पराभूत केले आणि बाबर आझमच्या पाकिस्तानला धूळ चारून अफगाणिस्तानने 'हम भी किसी से कम नहीं' हे दाखवून दिले. या विजयासह संघाने गुणतालिकेत झेप घेतली आहे. मात्र, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पाकिस्तानवरील विजयाला उलटफेर म्हणण्यास विरोध दर्शवला.
पाकिस्तानी संघाला विश्वचषक स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर शेजाऱ्यांना अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ७ गड्यांच्या मोबदल्यात २८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानकडून सलामीवीर इब्राहिम झादरान आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या अर्धशतकानंतर रहमत शाहच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आणि कर्णधार हशमतुल्लाहच्या बळावर अफगाणिस्तानने ४९ षटकांत लक्ष्य गाठले आणि अविस्मरणीय विजय साकारला.
पाकिस्तानच्या पराभवानंतर शेजाऱ्यांना सर्वच स्तरातून ट्रोल केले जात आहे. एकिकडे हा विश्वचषकातील मोठा उलटफेर असल्याचे बोलले जात असताना गौतम गंभीरने मात्र पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळल्याचे दिसते. या सामन्यानंतर इरफान पठाणशी बोलताना गंभीरने पाकिस्तानी संघाला अफगाणिस्तानपेक्षा कमी लेखले. गंभीरने म्हटले, "अफगाणिस्तानच्या या विजयाला मी उलटफेर मानत नाही. कारण मला वाटते की, पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला असता तर नक्कीच मोठा उलटफेर झाला असता."
अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय दरम्यान, अफगाणिस्तानने ८ गडी आणि ६ चेंडू राखून शेजाऱ्यांचा पराभव केला. चेन्नईत झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सावध आणि संयमी खेळ दाखवला. प्रथम गोलंदाजीत आणि आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने शानदार फलंदाजी करून अप्रतिम विजय मिळवला.