भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) यांच्या घरातील कलह चव्हाट्यावर आला आहे. रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंग जडेजा ( Anirudhsinh Jadeja) यांनी भारतीय क्रिकेटपटू आणि त्याची आमदार पत्नी रिवाबा जडेजा ( Rivaba Jadeja) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र व रिवाबा यांच्याशी आपला कोणताच संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत अनिरुद्धसिंग यांनी हे टोकाचे आरोप केले. ते म्हणाले,''रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिबावा जडेजा यांच्याशी माझं काहीच नातं नाही, हे सत्य आज मी तुम्हाला सांगतोय. आम्ही त्यांना कॉल करत नाही आणि ते आम्हाला कॉल करत नाही. जडेजाच्या लग्नाच्या दोन-तीन महिन्यानंतर हा वाद सुरू झाला. सध्याच्या घडीला मी रवींद्रच्या घरात नाही, तर जामनगर येथे राहतोय.''
''रिबावाने त्याच्यावर कोणती जादू केलीय हे माहित नाही. पण, माझ्या मुलासाठी माझं काळीज तुटतंय. त्याने लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. त्याला मी क्रिकेटपटूच बनवलं नसतं तर बरं झालं असतं. किमान असा दिवस पाहायला मिळाला नसता. तिला फक्त पैसा हवा आहे,''असेही ते म्हणाले.
६ डिसेंबर १९८८ मध्ये रवींद्रचा जन्म गुजरातच्या जामनगर येथील नवागाम गड सिटी येथील गुजराती रजपूत कुटुंबात झाला. रवींद्रने भारतीय सैन्यात जावं अशी त्यांची इच्छा होती, परंतु त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये रवींद्रची आई लता यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यावेळी रवींद्रने क्रिकेट सोडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. २०१६मध्ये रवींद्र व रिवाबा यांचे लग्न झाले आणि त्यांनी त्यांच्या कन्येचं नाव निध्याना असे ठेवले आहे.