नवी दिल्ली - केपटाऊनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या 160 धावांच्या जबरदस्त खेळीनंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गज त्याचे चाहते झाले असून, कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मायकल क्लार्क, जावेद मियादाद नंतर आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमही विराट कोहलीचे गुणगान गात आहे. भारताचा रन मशीन विराट कोहलीसमोर गोलंदाजी करणं आपल्यालाही कठीण झालं असतं असं वसीम अक्रमने म्हटलं आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत वसीम अक्रमने विराट कोहलीची स्तुती केली आहे. विराट कोहलीने फिटनेसला एका वेगळ्या उंचीवर नेलं असल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे. वसीम अक्रम बोलला आहे की, 'नक्कीच फिटनेस अत्यंत महत्वाचा आहे. एका ठराविक वयानंतर फलंदाज दक्ष होतो आणि त्याला आपण कशाप्रकारे धावा करु शकतो याचा अंदाज येतो. मला वाटतं कोहलीला दोन ते तीन वर्षांपुर्वीच आपण कोणते शॉट खेळले पाहिजेत आणि कशाप्रकारे जास्तीत जास्त धावा करु शकतो याचा अंदाज आला होता, आणि त्याप्रमाणे त्याने खेळण्यास सुरुवात केली'.
एकेकाळचा महान गोलंदाज ठरलेल्या वसीम अक्रमने ही गोष्टदेखील मान्य केली की, मला स्वत:लादेखील विराटसमोर गोलंदाजी करणं कठीण गेलं असतं. वसीम अक्रमने म्हटलं आहे की, 'विराट कोहलीला खेळताना पाहणं आनंद देतं. जर मी तरुण असतो आणि विराट कोहलीसमोर गोलंदाजी करण्याची वेळ आली असती, तर नेमका कुठे बॉल टाकायचा हा प्रश्न पडला असता. कोणत्याही प्रकारची खेळपट्टी असो, कोहलीला फरक पडत नाही कारण तो एक संपुर्ण खेळाडू आहे. मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननंतर आता त्यांचा क्रमांक आहे'.
दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिस-या एकदिवसीय सामन्यातील विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीवर बोलताना वसीम अक्रमने म्हटलं की, 'कोहली प्रत्येक बाबतीत सर्वोत्कृष्ट आहे. धावांचा पाठलाग करताना त्याने केलेले रेकॉर्ड्स आपण पाहिलेच आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो 90 च्या सरासरीने धावा करत आहे आणि आता त्याने 160 धावांनी नाबाद खेळी केली आहे'.