महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मागील आठवड्यात वानखेडे स्टेडियमवर आणलेलं वादळ आठवलं तरी, आजही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धडकी भरते. ४ चेंडूंत धोनीने करिष्मा करून दाखवला होता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ४२ वर्षीय धोनीची फटकेबाजी पाहून त्याने जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचा विचार करायला हवा, अशी चाहत्यांची भाबडी आशा आहे. पण, भारताचा कर्णधार रोहित शर्मा यासाठी धोनीला मनवण्यास तयार नाही, कारण त्याला कदाचित MSD चे उत्तर माहित आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन यांच्या पोडकास्टवर रोहितने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपबाबत व संघनिवडीबाबत गप्पा मारल्या. यावेळी त्याने महेंद्रसिंग धोनीला वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी तयार करणे अवघड असल्याचे सांगितले, परंतु त्याचवेळी तो अमेरिकेत येऊ शकतो, असे वक्तव्य केले. जेव्हा गिलख्रिस्टने MSD आणि दिनेश कार्तिक या दोन दिग्गजांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना पाहण्याची कल्पना मांडली, तेव्हा रोहित म्हणाला की, ''MSD ला वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी पटवणे कठीण जाईल, असे मला वाटते. तो आजारी आहे आणि थकला आहे. तो अमेरिकेत येतोय. पण, काहीतरी वेगळे करण्यासाठी. तो आता गोल्फ खेळतोय. माझ्या अंदाजानुसार, तो गोल्फ खेळायला अमेरिकेत येत आहे.”
शर्मा यांनी रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनीच्या ४ चेंडूत २० धावांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यामुळे सामन्यात फरक पडला. त्या सामन्यात CSK ने MI चा २० धावांनी पराभव केला. रोहित म्हणाला, “धोनी चार चेंडू खेळायला आला, त्याने खूप प्रभाव पाडला. त्याने २०-२२ धावा केल्या आणि शेवटी त्याच फरकाने पराभव झाला.”
मागच्या आठवड्यात जेव्हा मुंबईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झाला, तेव्हा दिनेश कार्तिकने ३५ चेंडूंत ८५ धावा चोपल्या होत्या. तेव्हा धोनीने DK ला ट्रोल केले होते. तो म्हणालेला, याला वर्ल्ड कप खेळायचा आहे. रोहितने आज गिलख्रिस्टच्या प्रश्नावर कार्तिकला मनवणे सोपे असल्याचे म्हटले.