बंगालच्या रणजी टीममध्ये असा एक खेळाडू आहे, जो त्याच्याच नावाने बनलेल्या स्टेडिअममध्ये क्रिकेट मॅच खेळणार आहे. टीम इंडियामध्ये जागा मिळविण्यासाठी दरवाजा ठोठावत असलेला ओपनर फलंदाज अभिमन्यु ईश्वरन त्याच्याच नावाच्या स्टेडिअममध्ये खेळणार आहे.
अभिमन्यूचे वडील रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन यांच्या क्रिकेट प्रेमाचाच हा परिणाम आहे. त्यांनी २००५ मध्ये देहरादूनमध्ये एक जमीन खरेदी केली होती. त्यावर स्वत:च्या खिशातून पैसे खर्चत फर्स्ट क्लास क्रिकेट स्टेडिअम बनविले होते. बंगाल आणि उत्तराखंड रणजी संघांमध्ये आज सामन्याला सुरुवात होणार आहे. या स्टेडिअमचे नाव अभिमन्यू क्रिकेट अकादमी स्टेडियम आहे.
ईश्वरन हा बांग्लादेश दौऱ्यावेळी भारतीय संघासोबत होता. परंतू त्याला डेब्यूची संधी मिळाली नव्हती. “ज्या मैदानावर मी लहानपणी क्रिकेटची बाराखडी शिकलो त्या मैदानावर रणजी सामना खेळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे स्टेडियम वडिलांच्या जिद्द आणि मेहनतीचे फळ आहे. घरच्या मैदानावर येणे नेहमीच चांगले वाटते पण एकदा तुम्ही मैदानात आलात की बंगालसाठी सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित होते, असे इश्वरन म्हणाला.
निवृत्तीनंतर दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर स्टेडियमचे नाव देणे ही नवीन गोष्ट नाही परंतु राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व न केल्यानंतरही सक्रिय प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या नावावर क्रिकेट स्टेडियमची नावे ठेवल्याची उदाहरणे फारशी नाहीत. 'अभिमन्यू स्टेडियम'मध्ये खेळणारा अभिमन्यू हा पिता आणि मुलगा दोघांसाठीही एक खास क्षण असणार आहे.
आरपी ईश्वरन यांनी सांगितले की, मी हे स्टेडियम केवळ माझ्या मुलासाठी नाही तर माझ्या खेळातील आवड म्हणून बांधले आहे. जेव्हा माझा मुलगा भारतासाठी १०० कसोटी खेळेल, तेव्हा ती खरी उपलब्धी असेल. मी 2006 मध्ये बांधकाम सुरू केले आणि ते सतत अपग्रेड करण्यासाठी मी माझ्या खिशातून खर्च करत आहे. यातून मला कोणताही आर्थिक फायदा होत नसून तो माझ्या खेळाच्या आवडीसाठीचा खर्च आहे.
आरपी ईश्वरन हे सीए आहेत. त्यांनी 1988 मध्ये 'अभिमन्यू क्रिकेट अकादमी'ची स्थापना केली होती. तर 1995 मध्ये अभिमन्यूचा जन्म झाला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अभिमन्यूने 19 शतके ठोकली आहेत. असा योगायोग महेंद्र सिंह धोनीच्या नशीबी आला आहे. रांचीच्या स्टेडिअमचे धोनीच्या नावे नामकरण झाल्यावर तो तिथे खेळला होता.