हे तर ‘घरच्या लग्नाआधीच घटस्फोट’जाहीर करण्यासारखे!

- मतीन खान नागपूर : टीम इंडिया २०२१च्या टी-२० विश्वचषकात बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरताच अनेक तज्ज्ञांनी मतप्रदर्शन केले. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 08:48 AM2021-11-10T08:48:33+5:302021-11-10T08:49:07+5:30

whatsapp join usJoin us
It's like announcing 'divorce before marriage at home'! | हे तर ‘घरच्या लग्नाआधीच घटस्फोट’जाहीर करण्यासारखे!

हे तर ‘घरच्या लग्नाआधीच घटस्फोट’जाहीर करण्यासारखे!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- मतीन खान

नागपूर : टीम इंडिया २०२१च्या टी-२० विश्वचषकात बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरताच अनेक तज्ज्ञांनी मतप्रदर्शन केले. २४ ऑक्टोबरला पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर संघाची स्थिती त्या घरासारखी झाली, ज्या घरी लग्नसोहळा आहे आणि वधुपिता घोषणा करतो की, लग्नानंतर मी माझ्या पत्नीशी घटस्फोट घेणार आहे! विराट कोहलीने याच धर्तीवर ऐन विश्वचषकाआधी नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. शास्त्री यांचा कार्यकाळ तर विश्वचषकानंतर संपणार होताच! मग घर सांभाळण्याची जबाबदारी कोण घेणार होते! अशा वेळी संघात गोंधळाची स्थिती निर्माण होणे स्वाभाविक होते.

युजवेंद्र चहल, दीपक चहर आणि शिखर धवन यांच्यासारख्या खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले. हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर यांना फिट नसताना सासरी जावयांची सरबराई होते, तशी वागणूक देण्यात आली. विराटच्या नेतृत्वात आयसीसी स्पर्धेत संघ नेहमी ढेपाळला आहे.  विराटला नेतृत्व सोडायचेच होते तर विश्वचषकाआधी सोडायला हवे होते किंवा स्पर्धा संपण्याची वाट पाहणे उत्तम ठरले असते. मात्र घोषणा करीत संघात त्याने अनिश्चितता निर्माण का केली?

प्रत्येक खेळाडू विश्वचषक जिंकण्याच्या निर्धाराने खेळण्याऐवजी स्वत:साठी खेळताना दिसला. न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर कोहलीची प्रतिक्रिया आठवा. तो म्हणाला, ‘आम्ही साहसी खेळ केला नाही, शिवाय आमची देहबोली चांगली नव्हती.’ हे जर तुला माहीत होते तर तू स्वत: काय केले?  अफगाणिस्तान, स्कॉटलँड, नामिबियाविरुद्ध विजयानंतर सर्व सुरळीत होईल, असे विराटला सांगायचे होते का? टीम इंडियाचा ग्रुप सोपा होता. आम्हाला केवळ एका मोठ्या संघाला हरवायचे होते, पण तेदेखील जमले नाही.
 

नामिबियावरील विजयानंतर बाहेर पडल्यानंतर कोहली आणि रवी शास्त्री फारच सहज वावरताना दिसले. शास्त्री यांची मजल तर,‘आमचे खेळाडू शारीरिक आणि मानसिकरीत्या थकले होते,’ हे सांगण्यापर्यंत गेली. याचा अर्थ कोट्यवधी चाहत्यांसोबत ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असाच प्रकार होता. अशी शेलकी वक्तव्ये करून शास्त्री यांनी निरोपाच्यावेळी स्वत:ची पत घालवली. भारत बाहेर पडला, पण कोच मात्र स्वत:साठी नोकरी आणि समालोचनाचे काम शोधण्यात व्यस्त आहेत. 

क्रिकेट हा भारतीयांसाठी धर्म आहे. विराट आणि शास्त्री यांच्या मनमानीमुळे भारत विश्वचषकाबाहेर पडला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्येच विराटचे पितृत्व रजेवर जाणे, एका महत्त्वाच्या सामन्यात रोहितऐवजी ईशान किशनला सलामीला पाठविणे, अश्विनसारख्या मॅचविनरला सातत्याने संघाबाहेर ठेवणे अशी मनमानी करणाऱ्या कर्णधार-कोच जोडीने अतिआत्मविश्वासाची झलक दाखविली. या दोघांच्या मनमानीमुळेच भारतीय चाहत्यांच्या विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.

खेळात शिस्त येते ती शिस्तीत राहणाऱ्या खेळाडूंमुळे! असे दुराभिमानी असतील तर आणखी काय होणार? तुमची कामगिरी हीच तुमची लोकप्रियता निश्चित करते. शायर वसीम बरेलवी यांच्या पुढील ओळी कोहली-शास्त्री यांच्या वागणुकीसाठी पुरेशा ठराव्यात. ते म्हणतात,  आसमां इतनी बुलंदी पे जो इतराता है, भूल जाता है ज़मीं से ही नज़र आता है।

Web Title: It's like announcing 'divorce before marriage at home'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.