मेलबोर्न :भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना लक्ष्य करीत, दूर बसून टीका करणे सोपे असल्याचे म्हटले आहे. भारताला पर्थमध्ये दुसऱ्या कसोटीत १४६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दिग्गज फलंदाज सुनील गावस्करसारख्या व्यक्तीने संघ व्यवस्थापनाच्या निवड नीतीवर प्रश्न उपस्थित करताना कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जबाबदार धरले.
शास्त्री यांनी कुणाचे नाव न घेता टीकाकारांची टीका आवडली नसल्याचे म्हटले आहे. शास्त्री यांनी संघाला लक्ष्य करणाºया माजी क्रिकेटपटूंना चोख प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘लाखो मैल लांब बसून चर्चा करणे सोपे असते. ते लांब बसून टीका करीत आहेत आणि आम्ही येथे दक्षिण गोलार्धात आहोत. संघाच्या हितासाठी सर्वोत्तम असलेल्या बाबी आम्ही करीत आहोत.’
संघ निवडीबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘एकमेव प्रश्न रवींद्र जडेजाला खेळविण्याबाबत होता. या व्यतिरिक्त दुसरा कुठला प्रश्न नव्हता.’ दुसºया कसोटी सामन्यादरम्यान जडेजा आणि ईशांत शर्मा यांच्यादरम्यान कॅमेराबद्ध झालेल्या वादाबाबत बोलाताना प्रशिक्षक म्हणाले, ‘मला याचे कधी (अशा प्रकारच्या कव्हरेजचे) आश्चर्य वाटले नाही. संघाला एकसंघ होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अनेक पद्धती असतात आणि ही त्यातील एक असावी, अशी आशा आहे.’
कर्णधार विराट कोहलीच्या मैदानावरील वर्तनावर आॅस्ट्रेलियन जाणकारांनी प्रश्न उपस्थित केले असले तरी शास्त्री यांनी मात्र कर्णधाराची पाठराखण केल्यामुळे आश्चर्य वाटले नाही. शास्त्री म्हणाले, ‘विराट शानदार होता. त्याच्या वर्तनामध्ये काय चूक होती. तुम्हाला प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे, पण त्याने कुठली मर्यादा ओलांडली नाही.’
‘आघाडीची फळी संघासाठी चर्चेचा विषय आहे. कारण लोकेश राहुल व मुरली विजय दोन कसोटी सामन्यांत सलग चार डावांमध्ये अपयशी ठरले, असेही प्रशिक्षक शास्त्री यांनी यावेळी कबूल केले. याविषयी शास्त्री यांनी पुढे सांगितले की, ‘संघाच्या आघाडीच्या फळीला जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्यांच्याकडे अनुभव असून ते योगदान देतील, असा मला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)
संघ व्यवस्थापन मयंक अग्रवालचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे संकेत शास्त्री यांनी दिले. शास्त्री म्हणाले, ‘मयंक युवा खेळाडू असून त्याने भारत ‘अ’ संघातर्फे खोºयाने धावा केल्या आहेत. स्थानिक क्रिकेटमधील त्याची कामगिरी शानदार आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल.’ पर्थमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताने लय गमावली नसल्याचे स्पष्ट करीत शास्त्री म्हणाले, मालिका १-१ ने बरोबरीत असून भारत चांगल्या स्थितीत आहे. भारताला अशी संधी दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडमध्ये मिळाली नव्हती.
Web Title: It's easy to criticize - Ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.