Join us  

बलाढ्य आॅस्ट्रेलियाला नमविणे इंग्लंडसाठी सोपे नाही

विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला यजमान इंग्लंडच्या मार्गात आता अडथळे निर्माण झाले. लंकेकडून पराभूत झालेल्या या संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता बलाढ्य तीन संघांसोबत चढाओढ करावी लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 3:33 AM

Open in App

- सुनील गावसकरविश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला यजमान इंग्लंडच्या मार्गात आता अडथळे निर्माण झाले. लंकेकडून पराभूत झालेल्या या संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता बलाढ्य तीन संघांसोबत चढाओढ करावी लागेल. सर्वांत पहिला अडथळा असेल तो जगज्जेत्या आॅस्ट्रेलियाचा. जेसन रॉय जखमी झाल्यामुळे इंग्लंडला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी आता जोस बटलर याच्या खांद्यावर आली. बटलर सध्या अपयशीच ठरलेला दिसतो. याशिवाय गोलंदाजांनी अधिक धावा मोजल्यास फलंदाजांना मोठी धावसंख्या सर करणे अवघड जाते. या संघाने जे दोन सामने गमावले ते लक्ष्याचा पाठलाग करतानाच होते. संघासाठी हा आणखी एक चिंतेचा विषय ठरतो.दुसरीकडे भारताकडून एकमेव पराभव पत्करल्यापासून आॅस्ट्रेलियाने फलंदाजीत सुधारणा घडवून आणली. कर्णधार अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीवीरांनी शतके ठोकली तर ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ यांनी धावांचे चांगले योगदान दिल्यामुळे हा संघ भक्कम वाटतो. अखेरच्या काही षटकात धावांची झटपट भर घालण्याचे काम ग्लेन मॅक्सवेल करीत आहे. गोलंदाजीतही आॅस्ट्रेलिया भेदक वाटत आहे. मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन हे अचूक आणि वेगवान मारा करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण आणतात. झम्पाचा फिरकी मारा गडी बाद करण्याइतपत सक्षम असल्याने आॅस्ट्रेलिया संघ बलाढ्य आणि समतोल वाटतो.भारत-पाकिस्तान यांच्यातील कट्टर पारंपरिक वैर सर्वश्रुत आहे. असेच कडवे वैर इंग्लंड-आॅस्ट्रेलिया यांच्यात पहायला मिळते. द. आफ्रिकेविरुद्ध कसोटीत चेंडू कुरतडल्याप्रकरणी वॉर्नर आणि स्मिथ यांना झालेली शिक्षा इंग्लिश चाहते विसरले नसावेत. आॅस्ट्रेलियाविरुद्ध सामना असेल तेव्हा इंग्लिश चाहते मैदानात येतात. प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचण्याची संधी सोडत नाहीत. विश्वचषकाच्या सामन्यातही अशी संधी ते सोडणार नाहीत, पण वॉर्नर-स्मिथ यांनी दडपण न येऊ देता ताठ मानेने धावा काढायला हव्यात.कोहलीने आॅस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात स्मिथ आणि वॉर्नर यांची हुटिंग करू नका, त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा, असे प्रेक्षकांना आवाहन करीत खिलाडूवृत्तीचा परिचय दिला होता. मैदानावर खेळाडूंना सन्मान मिळायलाच हवा, यात कुणाचे दुमत होणार नाही. विश्वचषकात मागील काही सामने अत्यंत चुरशीचे झाले. इंग्लंड- आॅस्ट्रेलिया हा सामना देखील तितकाच उत्कंठापूर्ण होईल, यात शंका नाही.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडआॅस्ट्रेलिया