घरच्या मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून येणाऱ्या प्रचंड दबावाची रोहित शर्माला जाण आहे आणि त्यामुळेच बाहेर होणाऱ्या चर्चांपासून त्याला स्वतःला दूर ठेवायचे आहे. भारताला दशकानंतर आयसीसी ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ हा पराक्रम करेल असा विश्वास चाहत्यांना आहे. पण, या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडणे हे खूप आव्हानात्मक काम आहे याची जाण रोहितला आहे. ५ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्या लढतीने वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे.
आशिया चषक स्पर्धेपूर्वी रोहितने पीटीआयला दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितले, "माझ्यासाठी, मी स्वतःला कसे रिलॅक्स ठेवतो आणि बाहेर काय चाललंय याचा फार विचार करत नाही, मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. मला सर्व काही बंद करायचे आहे. २०१९ च्या वर्ल्ड कपपूर्वी मी ज्या टप्प्यात होतो, त्या टप्प्यात मला जायचे आहे. मी स्पर्धेसाठी खरोखरच चांगली तयारी केली होती." वर्ल्ड कप २०१९ मध्ये रोहितने ५ शतकांसह सर्वाधिक ६४८ धावा केल्या होत्या.
"मी चांगल्या स्थितीत, चांगली मानसिकता आहे. मला तसा खेळ परत करायचा आहे आणि ते करण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे. एक क्रिकेटर म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून २०१९ च्या वर्ल्ड कपपूर्वी मी कोणत्या योग्य गोष्टी करत होतो ते आठवण्याचा प्रयत्न करत आहे. मला वैयक्तिकरित्या माझ्या त्या विचारप्रक्रियेची पुन्हा भेट द्यायची आहे,” असेही कर्णधार म्हणाला.
रोहितला असे वाटते की " मन मोकळे ठेवणे आवश्यक आहे" आणि प्रत्येकाचे मत ऐकणे आणि त्याच्या सभोवतालचे इतर लोक काय विचार करत आहेत, याबबतही तो विचार करतो. "असे नाही, मला ही व्यक्ती आवडत नाही, म्हणून मी त्याला वगळत आहे. कर्णधारपद हे वैयक्तिक आवडीनिवडी आणि नापसंतीवर आधारित नसते. जर कोणी चुकले तर त्याचे कारण आहे. जर तुम्ही दुर्दैवी असाल तर आम्ही काही करू शकत नाही," असे सांगून त्याने २०११च्या वर्ल्ड कप संघाच्या घोषणेनंतर काय झाले हेही सांगितले.
"मी उदास होतो आणि माझ्या खोलीत बसलो होतो. पुढे काय करावे हे मला कळत नव्हते. मला आठवते की युवीने (युवराज सिंग) मला त्याच्या खोलीत बोलावले आणि जेवायला बाहेर नेले. त्याने मला समजावून सांगितले की जेव्हा तुला बाहेर ठेवले जाते तेव्हा कसे वाटते. तो मला म्हणाला, 'सर्वात चांगली गोष्ट ही आहे की तुझ्यासमोर इतकी वर्षे आहेत. आम्ही वर्ल्ड कप खेळत असताना, तू ही संधी कठोर परिश्रम करण्यासाठी वापर. तू भारतासाठी खेळणार नाही किंवा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळणार नाही, असा कोणताही मार्ग नाही. मी कठोर परिश्रम केले आणि वर्ल्ड कपनंतर लगेचच मी पुनरागमन केले. हा मी आहे, जो या भावनेतून गेलो आहे,''असेही रोहित म्हणाला.