लंडन : इंग्लंड क्रिकेट संघाने आपल्या सर्व खेळाडूंना पुरेपूर विश्रांती आणि संधी मिळण्यासाठी गेल्या काही मालिकांपासून रोटेशन पद्धतीचा अवलंब केला. मात्र, याचा फायदा कमी आणि फटका जास्त बसल्याचे संकेत कर्णधार जो रूट याने आपल्या वक्तव्यातून दिले. ‘आता रोटेशन पद्धत थांबविण्याची वेळ आली असून यामुळे भारताविरुद्ध आणि अॅशेस मालिकेत इंग्लंडचा मजबूत संघ उतरवता येईल’, असे रूट म्हणाला.
‘यामुळे इंग्लंडचे खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत टीव्हीवर पाहण्याऐवजी या सामन्यात आव्हान देऊ शकतील’, असेही रूटने म्हटले. या वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडने आपला सर्वोत्तम संघ खेळवला नव्हता. काही प्रमुख खेळाडूंना रोटेशन पद्धतीनुसार सक्तीची रजा देण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची (ईसीबी) रोटेशन पद्धत क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरली होती. भारताविरुद्धची मालिका १-३ अशी गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या शर्यतीतूनही बाहेर पडला.
डब्ल्यूटीसीच्या नव्या सत्राची सुरुवात भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंगहॅम येथे चार ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून होईल. या मालिकेविषयी रूटने सांगितले की, ‘आता अशी वेळ आली आहे, जिथे आम्हाला विश्रांती आणि रोटेशन पद्धत मागे टाकावी लागेल. आशा आहे की, सर्व खेळाडू तंदुरुस्त राहिले, तर आम्ही आमचा सर्वोत्तम संघ खेळवू. ही मालिका अत्यंत रोमांचक होईल आणि मी यासाठी उत्सुक आहे.’
जॉनी बेयरस्टॉ आणि मार्क वूड पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध खेळू शकले नव्हते. मात्र, चौथ्या सामन्यांत त्यांना खेळता आले. तसेच इंग्लंडचा आघाडीचा आणि पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक जोस बटलर याला पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतावे लागले होते. पण आता असे होणार नाही, अशी आशाही रूटने व्यक्त केली. रूट पुढे म्हणाला की, ‘आम्हाला दोन शानदार प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध दहा अत्यंत अटीतटीचे कसोटी सामने खेळायचे आहेत.
अॅशेससाठी चांगली तयारी होईल!भारताविरुद्ध आव्हानात्मक मालिका अॅशेसच्या तयारीसाठी चांगली ठरेल, असे मत रूटने व्यक्त केले. तो म्हणाला की, ‘आगामी पाच सामन्यांच्या मालिकेत आमचा सर्वोत्तम संघ खेळेल, अशी आशा करतो. आगामी अॅशेस मालिकेसाठी हे आमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या सर्व मोठ्या सामन्यांसाठी आमचे सर्व खेळाडू तंदुरुस्त राहतील, याकडेही आमचे लक्ष असेल.’