विराट कोहलीनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला अन् एका यशस्वी पर्वाचा शेवट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर २४ तासांत विराटनं सोशल मीडियावर हा बॉम्ब टाकला. विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सर्वाधिक ६८ पैकी ४० विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियात मिळवेला ऐतिहासिक कसोटी मालिका विजय, हा विराटच्याच नेतृत्वाखाली अनुभवायला मिळाला. घरच्या मैदानावर खेळलेल्या ११ पैकी ११ कसोटी मालिका भारतानं जिंकल्या. आता विराटच्या राजीनाम्यानंतर येणाऱ्या नव्या कर्णधारावर ही यशोगाथा अशीच पुढे सुरू ठेवण्याचं आव्हान असणार आहे.
विराट कोहलीनं मागच्यावर्षी ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं त्याची वन डे संघाच्या कर्णधारपदावरूनही हकालपट्टी केली. त्यामुळे ३३ वर्षीय विराट नाराज होता आणि त्यामुळेच त्यानं कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आता कर्णधारपदाचे कोणतेही ओझे खांद्यावर नसलेला विराट धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे अनेकांना आता पुन्हा तोच जुना रन मशीन विराट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानंही विराटच्या या निर्णयावर मत व्यक्त केलं आहे. Sama TV वर बोलताना माजी अष्टपैलू खेळाडूनं विराटच्या निर्णयाला समर्थन दिले. तो म्हणाला,''माझ्या मते हा योग्य निर्णय आहे. विराटनं भारताचे बऱ्याच सामन्यात नेतृत्व सांभाळले आहे आणि कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय योग्य असल्याचे मला वाटते. कारकीर्दित एक काळ असा येतो की तुम्हाला दडपणाचे ओझे पेलवत नाही आणि त्याचा तुमच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम होतो. त्यानं प्रदीर्घ काळ कर्णधारपद भूषविले आणि सर्वोत्तम कामगिरी केली. आता एक फलंदाज म्हणून त्याच्या खेळाचा आस्वाद लुटण्याची वेळ आली आहे.''