नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीमधील घटनांबाबतची माहिती समोर येत आहे. भारतीय संघाचे माजी फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनीही आता रवी शास्त्रींच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या काळातील घटनांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रीधर यांनी याबाबतची माहिती देताना भारतीय संघ अॅडिलेडमध्ये ३६ आणि लीड्सवर ७८ धावांत ऑलआऊट झाल्यावर काय घडलं, याचीही माहिती दिली आहे.
मुलाखतीदरम्यान, श्रीधर यांना त्यांचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलिंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याशी मतभेद व्हायचे का? असे विचारले असता ते म्हणाले की, सर्वश्रेष्ठ निकाल मिळण्यासाठी सर्व प्रशिक्षकांमध्ये मतभेद होणे गरजेचे आहे. आमच्यामध्येही नेहमी मतभेद व्हायचे. मग मी असो, रवी भाई, भरत सर असो वा संजय बांगर आणि विक्रम राठोड या सर्वांमध्ये मतभेद व्हायचे. मात्र आम्ही सर्वजण एकच लक्ष्य प्राप्त करण्यासाठी काम करत होतो. यामध्ये अनेकदा दोघांचे एकमत व्हायचे. कधी व्हायचे नाही. आम्ही वेगवेगळ्या दृष्टीकोनामधून चर्चा करून निर्णय घ्यायचो, जो भारतीय क्रिकेटसाठी सर्वात उपयुक्त ठरेल. आमचे मत फेटाळून लावले गेले, असे आम्हाला कधी असे वाटले नाही.
दरम्यान, अॅडिलेडमध्ये ३६ धावांवर उडालेली दाणादाण आणि लीड्सवर ७८ धावांवर उडालेल्या भारतीय फलंदाजीच्या धुव्व्यावर बोलताना श्रीधर यांनी सांगितले की, ही शिकण्यासाठीची चांगली संधी होती. प्रशिक्षक म्हणून खराब कामगिरी मला प्रशिक्षणाची चांगली कामगिरी प्राप्त करून देते, असे सांगितले. तसेच भारतीय ड्रेसिंग रूममधील ७ वर्षे हा माझ्या जीवनातील सर्वोत्तम कालावधी होता, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीधर यांनी रवी शास्त्रींचे कौतुक करताना सांगितले की, रवी शास्त्रींना तुम्ही कधीही खेळासंबंधीचे सल्ले देऊ शकता. ते हे सल्ले धुडकावून लावणार नाहीत. त्यांच्याकडे नेतृत्व गुण आणि व्यवस्थापनाचे चांगले कौशल्य आहे. तसेच संघाच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्याचीही त्यांच्याकडे क्षमता आहे, अशा शब्दात अरुण यांनी त्यांचे कौतुक केले.