नवी दिल्ली : रणजी करंडकाचे सामने खेळण्याचा सल्ला धुडकावून लावल्यामुळे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयने काल केंद्रीय करारातून डच्चू दिला. बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करीत माजी डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंना हा नियम का लागू केला नाही, अशी विचारणा केली आहे.
बीसीसीआयने बुधवारी ईशान आणि श्रेयस यांचा करार रद्द केला होता. दुसरीकडे २०१८ पासून एकही कसोटी न खेळलेल्या हार्दिक पांड्याचा मात्र ‘अ’ श्रेणीत समावेश केला आहे. यावर टीका करीत इरफानने एक्सवर लिहिले, ‘हार्दिकसारखे खेळाडू रेड बॉल क्रिकेट खेळण्यास इच्छुक नसतील तर त्याला आणि त्याच्यासारख्या अन्य खेळाडूंना पांढऱ्या चेंडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू द्यावे का? हा नियम सर्वांसाठी लागू होत नसेल तर बीसीसीआयला याचे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.’
ईशानने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दाैऱ्यातून मानसिक विश्रांतीसाठी माघार घेतली. त्यानंतर तो झारखंडकडून रणजी सामनेदेखील खेळला नव्हता. तो मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलच्या तयारीला लागला.
अय्यरदेखील बडोद्याविरुद्ध रणजी सामना खेळला नव्हता. जखमेमुळे इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळल्यापासून तो संघाबाहेर आहे. यावर इरफान पुढे म्हणाला, ‘हे दोघे प्रतिभावान खेळाडू आहेत. दोघेही दमदार पुनरागमन करतील, अशी मला खात्री आहे.’