नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) केंद्रीय करारातून वगळण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना करारबद्ध करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. त्याचवेळी, मोहम्मद शमीला केंद्रीय करारातून वगळण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
'बीसीसीआय'च्या २०२४-२५ सत्राच्या केंद्रीय करारात अय्यर आणि किशन यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली. अय्यरला 'ब' श्रेणीमध्ये स्थान मिळू शकते आणि यानुसार त्याला वर्षाला ३ कोटी रुपयांचे मानधन मिळू शकते. अय्यर आणि किशन यांना 'बीसीसीआय'च्या निर्देशानुसार देशांतर्गत स्पर्धांकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांना २०२३-२४च्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते.
यानंतर अय्यरने एकदिवसीय संघातून सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. तसेच किशनने हैदराबादकडून यंदाच्या 'आयपीएल'मध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात तडाखेबंद शतक झळकावले आहे. अय्यरने भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदामध्येही मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे त्याचा केंद्रीय करारात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. 'बीसीसीआय'कडून लवकरच केंद्रीय कराराची अधिकृत यादी जाहीर होईल.
शमीबाबत अनिश्चितता
अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापतीचा फटका बसू शकतो. दीर्घकालीन दुखापतीमुळे तो गेल्या वर्षी पूर्ण हंगामात खेळू शकला नाही. यंदाच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत त्याने पुनरागमन केले असले तरी त्याचा करार कायम राहण्याबाबत स्पष्टता नाही.
रोहित शर्मा, विराट कोहली, जडेजा कायम
रोहित शर्मा, विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांचे 'अ+' (A+) श्रेणीतील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतील. रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय 'टी-२०'मधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याचा करार कायम राहण्याची शक्यता आहे.