नवी दिल्ली : युवा फलंदाज श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक- फलंदाज ईशान किशन यांच्या कृतीवर बीसीसीआय नाराज आहे. स्थानिक सामन्यांकडे पाठ फिरवून बीसीसीआयचे निर्देश धुडकावणाऱ्या या दोघांचा केंद्रीय करार रद्द होण्याची दाट शक्यता आहे. दोघांनीही आयपीएलला प्राधान्य देण्यासाठी वेगवेगळी कारणे पुढे करत रणजी सामने खेळण्यास टाळाटाळ केली, असे निष्पन्न झाले आहे.
श्रेयस अय्यर मार्च २०२३ च्या केंद्रीय करारात ब गटात होता. कराराअंतर्गत श्रेयसला वर्षाला ३ कोटी रुपये मिळतात. ईशान किशनचा ‘क’ गटात समावेश आहे. त्याला वर्षभरासाठी एक कोटी रुपये मिळतात. बीसीसीआय काही दिवसांत नव्या केंद्रीय कराराची घोषणा करण्याची शक्यता आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने २०२३-२४ साठी करारबद्ध करायच्या खेळाडूंची यादी जवळपास निश्चित केली असल्याचे वृत्त आहे. यादीची घोषणा लवकरच केली जाईल. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना मात्र डच्चू मिळू शकतो.
ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली. त्यानंतर तो दुबईत मौजमजा करताना दिसला. काही दिवसांपूर्वी बडोद्यात हार्दिक पांड्यासोबत सराव करताना दिसला. आता तो थेट आयपीएल खेळण्याची शक्यता आहे.
अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या कसोटीत संघात स्थान देण्यात आले नव्हते. बीसीसीआयने अय्यरला वगळण्याचे कारण सांगितले नाही. अय्यरने पाठदुखीचे कारण पुढे करत रणजी बाद फेरीचा सामना टाळला होता. दरम्यान, काल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने केलेल्या खुलाशानुसार अय्यर हा दुखापतग्रस्त नसल्याचे स्पष्ट केले. आयपीएलसाठी रणजी सामना टाळता यावा, या उद्देशाने त्याने हा बनाव रचल्याचे एनसीएच्या वैद्यकीय पथकात स्पष्ट झाले.