बंगळुरू : विराट कोहलीच्या पहिल्या कौंटी मोसमामुळे अफगाणिस्तानविरुद्ध १४ जूनपासून सुरु होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय निवड समिती मंगळवारी भारतीय संघाची निवड करणार आहे.
जून महिन्यात कोहली सरेतर्फे कौंटी सामने खेळणार आहे. त्यामुळे तो महिन्याच्या शेवटी डब्लिन येथे आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाºया दोन टी-२० सामन्यांनाही मुकणार आहे. कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी अजिंक्य रहाणे सज्ज असून रोहित शर्मा टी-२० सामन्यांत संघाचे नेतृत्व करेल, असे बीसीसीआयच्या अधिका-याने सांगितले.
कोहलीचा अपवाद वगळता सर्व नियमित कसोटीपटू अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळण्याची शक्यता आहे. चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा इंग्लंडहून परतण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांमध्ये चुकीचे वृत्त आले असून अफगाणिस्तानविरुद्ध पुजारा नक्की खेळणार आहे. ईशांतबाबतही असेच वृत्त प्रकाशित झाले होते.
कोहलीच्या पर्यायाबाबत विचार करता एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्ध अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी असल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही पर्यायी खेळाडूंचा यापूर्वीच विचार
केलेला आहे. कोहलीसाठी अय्यर, जडेजासाठी अक्षर पटेल, हार्दिक पांड्यासाठी विजय शंकर अशी यादी आहे. त्यामुळे आम्ही हाच पॅटर्न वापरणार असल्याचे निवड समिती सदस्याने स्पष्ट केले. निवड समितीने यापूर्वी कोहलीचा पर्याय म्हणून आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला कसोटीमध्ये अय्यरची निवड केली होती. त्यावेळी कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. अय्यरला अंतिम ११ खेळाडूंत संधी मिळाली नाही. कुलदीप यादवने यशस्वी पदार्पण केले होते. ४६ प्रथम श्रेणी सामन्यात ५३.९० च्या सरासरीने ३९८९ धावा फटकावणाºया अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. मुरली विजयी, शिखर धवन, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांचे ११ खेळाडूंतील स्थान निश्चित आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी अय्यर आणि रोहित शर्मा यांच्यात चुरस राहील. रोहितची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी विशेष चांगली नाही. (वृत्तसंस्था)
पृथ्वी, शुभमान आणि शिवम यांच्या निवडीवर लक्ष
त्याचसोबत निवड समिती युकेतील मर्यादित षटकांच्या सामन्यांसह इंग्लंड दौ-यावर जाणा-या भारत ‘अ’ संघाची निवड करणार आहे. दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी श्रीलंका दौ-यात खेळणा-या संघांतील अनेक खेळाडू संघात कायम राहण्याची शक्यता आहे. अनुभवी अंबाती रायडूचा आयपीएलतील सध्याचा फॉर्म बघता त्याची चर्चा होण्याची शक्यता आहे.
युवा पृथ्वी शॉ, शुभमान गिल आणि शिवम मावी यांना राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाºया भारत ‘अ’ संघाच्या इंग्लंड दौºयासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. भारत ‘अ’ संघाचा इंग्लंड दौरा २२ जूनपासून प्रारंभ होणाºया तिरंगी एकदिवसीय मालिकेने होईल. या मालिकेत इंग्लंड लॉयन्स (अ संघ) आणि वेस्ट इंडिज ‘अ’ संघांचा समावेश आहे.
भारत ‘अ’ संघ १६ ते १९ जुलै या कालावधीत वोरसेस्टर येथे लॉयन्सविरुद्ध चार दिवसीय कसोटी सामना खेळणार आहे. त्याचसोबत कौंटी संघांसोबत दोन तीन दिवसीय सामने खेळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना संपल्यानंतर सात नियमित कसोटीपटू इंग्लंडला रवाना होणार आहेत.
Web Title: Iyer will get opportunity to replace Kohli? Today's selection for the Test match against Afghanistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.