नवी दिल्ली : हा मथळा वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. महेंद्रसिंग धोनी म्हणजे शांत व्यक्ती. कॅप्टन कूल ही त्याला दिलेली उपाधी शोभणारी अशीच. तर हा नेहमीच शांत असलेला कर्णधार एका खेळाडूला धमकी वगैरे देऊ शकतो, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं घडलंय. इंग्लंडच्या एका दौऱ्यात धोनीने यजमानांच्या संघातील एका खेळाडूला " ड्रेसिंग रुमच्या आसपास जरी फिरकलास तुझा जीव घेईन, " अशी चक्क धमकी दिली होती.
ही गोष्ट आहे 2014 सालची. जेव्हा भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. यापूर्वी 2013च्या इंग्लंड दौऱ्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. 2014च्या इंग्लंड मालिकेतील चौथा सामना ट्रेंट ब्रिजला खेळवला गेला होता. या सामन्यातच धोनीने इंग्लंडच्या एका खेळाडूला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या सामन्यात भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सज्ज होता. धोनीसह रवींद्र जडेजा चांगली फलंदाजी करत होते. या दोघांवर लंच ब्रेकपर्यंत फलंदाजी करण्याची जबाबदारी होती. हे दोघे दमदार फलंदाजी करत होते. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने स्लेजिंग करायला सुरुवात केली. या स्लेजिंगचा धोनीवर जास्त परीणाम झाला नाही, पण जडेजाला मात्र अँडरसनला प्रत्त्यूत्तर द्यायला सुरुवात केली. दोघांमध्ये बाचाबाची व्हायला सुरुवात झाली होती. पण काही वेळातच लंच ब्रेक झाला. त्यावेळी लंचला जात असताना अँडरसन जडेजाला म्हणाला की, " तुला ड्रेसिंगरुममध्ये येऊन फटके देईन. " अँडरसनच्या या वक्तव्यावर धोनी चांगलाच भडकला आणि तो अँडरसनला म्हणाला " भारतीय ड्रेंसिंग रुमच्या आसपास जरी फिरकलास तर तुझा जीव घेईन. "
धोनीला या रुपात पाहून अँडरसन चांगलाच घाबरला. एरव्ही शांत राहणार धोनी आपल्यावर भडकला म्हणजे आपल्याकडून नक्कीच मोठी चूक झाली, हे अँडरसनला कळून चुकले. त्यमुळे त्यानंतर त्याने भारतीय खेळाडूंची छेड काढली नाही.