दिग्गज यष्टिरक्षक मार्क बाउचर याची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर संघात अनेक सकारात्मक बदल होताना पाहायला मिळत आहे. बाउचरनं आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एबी डिव्हिलियर्सला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन संघात कमबॅक करण्यासाठी राजी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यात बुधवारी संघात आणखी एक मोठा बदल पाहायला मिळाला. महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याची संघाच्या फलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आफ्रिकेचा संघ 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत इंग्लंडचा सामना करणार आहे. इंग्लंडचा संघ आफ्रिका दौऱ्यावर येणार आहे आणि त्यात चार कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी कॅलिसची फलंदाज सल्लागारपदी नियुक्ती करण्याचा निर्णय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं घेतला आहे. कॅलिसकडे 519 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. त्यात त्यानं 25534 धावा आणि 577 विकेट्स घेतल्या आहेत. 2014मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतील. त्याच्या नावावर 62 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. त्यात 45 कसोटी आणि 17 वन डेतील शतकांचा समावेश आहे.
यावेळी फॅफ ड्यू प्लेसिसकडे कसोटी संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले, तर अॅशवेल प्रिंस आफ्रिका अ संघाचे नेतृत्व सांभाळेल. 43 वर्षीय बाउचरकडे टायटन्स संघाच्या प्रशिक्षकाचा अनुभव आहे. ऑगस्ट 2016 पासून तो या पदावर आहे. शिवाय मॅझन्सी सुपर लीग ट्वेंटी-20तील त्श्वाने स्पार्टन्स संगाच्या सहाय्याक स्टाफमध्येही त्याचा सहभाग आहे. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं 147 कसोटी, 295 वन डे आणि 25 ट्वेंटी-20 सामने खेळले आणि यष्टिंमागे जवळपास 999 बळी टिपले. बाउचरच्या मार्गदर्शनाखाली आफ्रिका तगड्या इंग्लंड संघाचा समाना करणार आहे. त्यात चार कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.