मुंबई - यशस्वी ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर राष्ट्रीय निवड समितीने शनिवारी न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी तीन एकदिवसी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. 22, 25 आणि 29 ऑक्टोंबरला भारत आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सामन्याचा थरार रंगेल. सलामीवीर शिखर धवनला संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन खेळला नव्हता. कौटुंबिक कारणामुळे शिखर धवन संघाबाहेर होता.
मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि दिनेश कार्तिकला 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. लोकेश राहुल, उमेश यादव आणि मोहम्मद शामी यांना संघातून वगळण्यात आले आहे. त्याशिवाय रविंद्र जाडेजा आणि आर.अश्विनलाही संघात स्थान मिळालेलं नाहीय.
कर्णधारपदाची जबाबदारी विराट कोहलीकडे असून, रोहित शर्मा उपकर्णधार असेल. एमएस धोनीशिवाय दिनेश कार्तिकच्या रुपाने एक अतिरिक्त यष्टीरक्षक संघामध्ये असेल.
भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, एमएस धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांडया, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव.